अहमदनगर : पंचायत समिती सभापती, उपसभापती पदासाठी रविवारी निवडी पार पडल्या. यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थानिक नेते आणि आमदार यांनी विधानसभा निवडणुकीचा डाव साधला. या निवडीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न नेत्यांकडून झाला. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याची रंगीत तालीम म्हणून पंचायत समितीच्या निवडीकडे पाहिले जात होते. जिल्ह्यात या निवडी दरम्यान आघाडी आणि युतीच्या बलाबलात फारसा फरक पडला नसला तरी श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना पंचायत समितीच्या सत्तेपासून लांब ठेवण्यात आघाडीने यश मिळविले आहे. तर पाथर्डीत आ. चंद्रशेखर घुले आणि प्रताप ढाकणे गटाने माजी आमदार राजीव राजळे यांना आश्चर्यकारक मात दिली आहे. पंचायत समितीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्याचे परिणाम काय होतात हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. मात्र, या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीचा पदर होता, हे कोणीच नाकारू शकत नाही. सभापतीपदी इनामके, उपसभापती तुरकणेराहाता : राहाता पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या सुरेखा इनामके, तर उपसभापतीपदी दीपक तुरकणे यांची बिनविरोध निवड झाली. राहाता पंचायत समितीत काँग्रेसचे पूर्ण बहुमत आहे. निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे व गटविकास अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ. भास्कर खर्डे, शांतीनाथ आहेर, रघुनाथ बोठे, निवास त्रिभुवन, बाबासाहेब डांगे, ताराचंद कोते, उत्तम कोते, संजय सदाफळ, उपस्थित होते.
पंचायत समितीआड विधानसभेचा डाव
By admin | Published: September 14, 2014 11:13 PM