श्रीगोंदा (अहमदनगर) : बंगळुरूची फुले, दिल्लीचे रूम फ्रेशनर, मखमली गालीचे, मुंबईचा सुकामेवा अन् सामिष भोजन असा पंचतारांकित बेत. गुलाबी रंगाच्या पायघड्यांवरुन चालत सनईचा मंजूळ स्वर श्रवण करीत श्रीगोंदा पंचायत समितीत दाखल झालेली पंचायत राज समिती अवाक् झाली. जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती तसेच गावागावांतील कामांची पाहणी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात पंचायत राज समिती दाखल झाली. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी समिती श्रीगोंदा पंचायत समितीत आली. तेथील समितीने केलेले जंगी स्वागत पाहून सदस्यांना श्रीगोंदा स्वर्गच जमिनीवर अवतरल्याचा भास झाला.
समितीकडून अहवालात झुकते माप मिळावे, म्हणून हा सर्व आटापिटा होता. ठिकठिकाणी रंगीबेरंगी झाडांच्या कुंड्या ठेवून समितीच्या सदस्यांचे मन रिझविण्याचा प्रयत्नही अधिकाºयांनी केला़ समितीतील प्रत्येक सदस्याला ५०० रूपयांचा ‘गोल्डन पेन’ही देण्यात आला. हा शाही थाट पाहून समितीचे सदस्यही अवाक् झाले. दोन मिनिटे तर एकही सदस्य मखमली गालीच्यावर बसला नाही. ज्यांच्यासाठी एवढी उधळपट्टी केली ती समिती अवघ्या ३० मिनिटांतच पंचायत समितीतून बाहेर पडली.फुलांकडे पाहून अहवाल देणार नाहीदुष्काळाचे सावट, हुमणीसारख्या किडीच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़ पण श्रीगोंदा पंचायत समितीने लाखो रुपये खर्च करून केलेला पाहुणचार योग्य वाटला का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे हा त्यांचा प्रश्न असल्याचे सदस्यांनी सांगितले.आम्ही तर जालन्यात चहाही प्यायलो नाही. श्रीगोंद्यात शाही स्वागत झाले असले तरी आम्ही अहवाल फुलांकडे पाहून देणार नाही, असे पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले.