अहमदनगर : ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्ण अखेरची घटका मोजत असताना नागापूर औद्योगिक वसाहतीतील तरुण उद्योजक, स्वराज्य कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवस- रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. अनेक उद्योजकांनीही पुढे येत आपल्याकडील ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. त्यांच्या या मदतीने अनेकांना जीवनदान मिळाले.
कोरोनाने कहर माजवला आहे. दररोज तीन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. यापैकी १५ ते २० टक्के रुग्ण गंभीर असतात. ज्या रुग्णांचा स्कोअर १६च्या पुढे आहे अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीत मागील आठवड्यात अचानक वाढ झाली होती; परंतु त्या तुलनेत पुरवठा होत नव्हता. ऑक्सिजनचे टँकर दोन दिवस येत नव्हते. ऑक्सिजन मिळाला तरच प्राण वाचतील, असा अंगावर शहारे आणणारा प्रसंग ओढावला होता. अशा कठीण परिस्थितीत नागापूर औद्योगिक वसाहतीतील तरुणांची एक टीम मदतीसाठी पुढे आली. या टीमने नागापूर औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन सर्चिंग मोहीम राबविली. उद्योजकांना उत्पादनासाठी ऑक्सिजन लागतो. त्यामुळे ते कमीअधिक प्रमाणात ऑक्सिजनचा साठा करून ठेवत असतात. परंतु, काम बंद असल्याने काहींकडे ऑक्सिजनच्या टाक्या पडून होत्या. आशा कंपन्यांचा शोध घेऊन त्यांना विनंती केली गेली. काहींनी स्वत: फोन करून आपल्याकडे ऑक्सिजन शिल्लक असल्याची माहिती दिली. उद्योजकांनी दिलेला ऑक्सिजन रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे काम रात्रंदिवस सुरू होते. मागणीच्या प्रमाणात मदत तुटपुंजी असली तरी ती वेळेवर मिळणे महत्त्वाचे होते. उद्योजकांनी ऑक्सिजन उपलब्ध करून दिल्याने शहरातील अनेक रुग्णालयांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. काहींचा बंद पडलेला ऑक्सिजन तातडीने सुरू झाल्याने त्यांचे प्राण वाचले.
...
हे आहेत एमआयडीसीतील ऑक्सिजनदूत
उद्योजक अमित बारवकर, शंकर शेळके, दीपक गिते, स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, सचिव अकाश दंडवते, आदींनी धावपळ करून रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून दिला.
...
- शहरातील एका रुग्णालयातून रात्री दोनच्या सुमारास फोन आला. ऑक्सिजन संपला आहे. काही तरी करा. एक तरी टाकी द्या, अशी विनंती रुग्णाच्या नातेवाइकाने केली. मी फोन करून माहिती घेतली व रात्री उशिराने दोन टाक्या उपलब्ध करून दिल्या. वेळेवर ऑक्सिजन मिळाल्याने रुग्णाचा जीव वाचला. हीच आमच्या सर्वांच्या कामासाठीची प्रेरणा होती. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी जे जे शक्य होते ते उद्योजक, पोलीस आणि कारखानदार आम्ही सर्वांनी मिळून केले.
- योगेश गलांडे, अध्यक्ष, स्वराज्य कामगार संघटना