अहमदनगर : शहरातील भोसले आखडा, सारसनगर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून लाल पाणी निघाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
वसंत टेकडी येथून भोसले आखाडा, सारसनगर आदी भागाला पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून लाल पाणी येत होते. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर ही बाब नगरसेवक गणेश भोसले यांनी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून दिली व पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना केल्या. पाणीपुरवठा बंद करून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सीएसआरडी महाविद्यालयासमोर हाती घेण्यात आले. ही जलवाहिनी जुनी असल्याने व्हॉल्व कर्मचाऱ्यांना माहित नव्हता. नगरसेवक भोसले यांनी तो दाखवून दिला. त्यानंतर हे काम सुरू झाले. काम सुरू असताना जलवाहिनीतून लाल पाणी बाहेर येऊ लागले. महापालिकेच्या बहुतांश जलवाहिन्यांच्या बाजूलाच ड्रेनेजलाईन टाकण्यात आलेल्या आहेत. ड्रेनेज लाईनला गळती लागल्यास हे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून दूषित पाण्याचा पुरवठा होतो. सारसनगर, भोसले आखाडा या भागातही असाच प्रकार घडला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.