अरुण वाघमोडेअहमदनगर : नवीन मोडस आॅपरेंडीचा (कार्यपद्धत) अवलंब करत जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन वर्षात परप्रांतीय टोळ्यांनी सराईतपणे हात साफ करत कोट्यवधी रूपयांची लूट केली आहे़ पोलिसांनी स्थानिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी परप्रांतीय चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़भरदिवसा होणाऱ्या घरफोड्या, लक्ष विचलित करून पैशांची लूट, एटीएम फोडणे, लग्नसमारंभात चोरी ते गावठी कट्ट्यांच्या तस्करीत या परप्रांतीय टोळ्या सक्रिय आहेत़ जिल्ह्यात मागील दोन वर्षात विविध ठिकाणी घडलेल्या अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथील टोळ्यांचा सहभाग समोर आला आहे़ गुन्हा करून या टोळ्या परराज्यात पसार होतात़ काही दिवसानंतर ठिकाण बदलून पुन्हा चोरीसाठी येतात़ पोलिसांना या चोरट्यांचा ठावठिकाणा लागला तरी त्यांना परराज्यात जाऊन अटक करणे मोठे जिकिरीचे ठरते़ परराज्यात चोरट्यांना अटक करण्यासाठी नगर येथून गेलेल्या पोलीस पथकाला बहुतांशवेळा स्थानिक पोलिसांची मदत मिळत नाही़ त्यामुळे हे चोरटे सहजासहजी पोलिसांच्या हाताला लागत नाहीत़ गेल्या वर्षभरात हरियाणा येथील टोळ्यांनी संगमनेर व लोणी येथे चार एटीएम फोडून लाखो रूपये लंपास केले़ या टोळीला हरियाणा येथील नूह जिल्ह्यात पकडण्यासाठी गेलेल्या येथील एलसीबी पथकावर तेथील गुंडांनी हल्ला केला होता़ चार महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने उत्तरप्रदेश येथील हापूर गँगला अटक केली़ महागड्या कार व सुटाबुटात येऊन या टोळीने नगर शहर व राहुरीत भरदिवसा घरफोड्या केल्या होत्या़या टोळीसह प्रतापगड (उत्तरप्रदेश), गुजरात व मध्यप्रदेश येथील टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ इतर परप्रांतीय चोरटे मात्र पसार आहेत़नगर जिल्ह्यात मध्यप्रदेश राज्यातील सैंधवा, लालगाब, कामठी, बडवानी, उंबरठी येथून मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांची तस्करी होते तर राजगड जिल्ह्यातील चोरट्यांच्या टोळ्या नगरमध्ये चोºया करण्यासाठी येतात़ येथील एका टोळीला दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़ या टोळीने शिर्डी व संगमनेर येथे लग्नसमारंभातून दागिने चोरले होते़उत्तरप्रदेशातील हायप्रोफाईल लुटारूउत्तरप्रदेश राज्यातील बुलंदशहर जिल्ह्यातील अनेक गावांत चोरट्यांचे प्रशिक्षण केंद्र चालविले जाते़ या केंद्रातून तयार झालेल्या टोळ्या सुटाबुटात येऊन अतिशय शिताफीने भरदिवसा घरफोडी करून जातात़ स्थानिक गुन्हे शाखेने चार महिन्यापूर्वी पकडलेली हापूर गँग येथील टोळी आहे़आॅनलाईन फसवणुकीत झारखंडचे मास्टरमाइंडबँक ग्राहकांना कर्ज देणे, लॉटरी लागली, बक्षीस लागले, एजन्सी द्यावयाची आहे़ असे विविध स्वरूपाचे आमिष दाखवून जिल्ह्यात मागील वर्षभरात अनेकांची आॅनलाईन फसवणूक झालेली आहे़ या फसवणुकीत दिल्ली परिसर, झारखंड राज्यातील सायबर गुन्हेगार सक्रिय असल्याचे समोर आले आहे़
हातचलाखी करणारे हरियाणवी ठगरस्त्यावर, बँकेच्या समोर लक्ष विचलित करून बँक ग्राहकांचे पैसे लंपास करण्याच्या मागील दीड वर्षात जिल्ह्यात ३६ घटना घडल्या आहेत़ या प्रकारे चोरी हरियाणा राज्यातील टोळ्या करत आहेत़ एटीएम फोडण्यातही याच टोळ्यांचा सहभाग आहे़स्थानिक गुन्हेगारांच्या अनेक टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे़ जिल्ह्यात गेल्या काही दिवसात परराज्यातील टोळ्या सक्रिय झाल्या आहेत़ यातील काही टोळ्यांना अटक करण्यात यश आले आहे़ इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे़ काही गुन्ह्यात परराज्यातील टोळ्यांचा सहभाग आढळून आला आहे़ परराज्यातून आरोपींना पकडणे जिकिरीचे काम आहे़ तरी या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. -दिलीप पवार, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा