अहमदनगर : महिलांमध्ये उपजतच चवदार पदार्थ बनविण्याची कला आहे. पण, त्यांना आकर्षक पॅकेजिंग करता येत नाही़ सरकारतर्फे महिलांना उत्तम पॅकेजिंग व मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाईल, तसेच त्यांच्या उत्पादनांचा ‘अस्मिता’ ब्रॅण्ड करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केली.साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रेतील बचत गटांतील महिलांना मार्गदर्शन करताना मुंडे बोलत होत्या. पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे, विभागीय आयुक्त महेश झगडे, उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने आदी यावेळी उपस्थित होते. बचत गटांच्या प्रदर्शनामध्ये तोच तोपणा आहे. तो बंद झाला पाहिजे़ केवळ सरकारचे पैसे खर्च करायचे म्हणून प्रदर्शने भरवू नका. प्रदर्शनातून महिला उद्योजक कशा बनतील, यावर भर द्यावा़ त्यासाठी लागणारी मदत सरकार करील, असे मुंडे यावेळी म्हणाल्या.बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. उद्योजकाच्या दृष्टीतून महिलांनी काम करण्याची गरज आहे. केवळ फळे आणून ते विकणे म्हणजे उद्योग नाही. त्यापासून काही नवीन पदार्थ तयार केले पाहिजेत. त्याचे आकर्षक पॅकिंग करून त्याला कुठे चांगला भाव मिळेल, याचाही अभ्यास केला पाहिजे़ बीड मतदारसंघात दरवर्षी प्रदर्शन भरते. तिथे अस्मिता हा नवीन ब्रॅण्ड तयार केला आहे. महिलांनी तयार केलेल्या मालाची विक्री करून त्यांना पैसे दिले जातात. त्यांना आता रिटेलर बनविण्याची भूमिका घेतली आहे, असे मुंडे म्हणाल्या.
बँका नाक मुरडतात
महिलांमध्ये जिद्द आहे. चिकाटी आहे, बचत गटांचा मालही चांगला आहे. प्रशिक्षण नाही़ वेळोवळी मागणी करूनही ते मिळत नाही़ त्याचबरोबर बँकांकडून अर्थसहाय्य केले जात नाही, अशी खंत विखे यांनी व्यक्त केली. बचत गटांच्या प्रदर्शनात गेल्या अनेक दिवसांपासून तोच तो पणा दिसतो. तो कमी करून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे सरकारने ब्रॅडिंग केले पाहिजे, असे मत झगडे यांनी यावेळी व्यक्त केले.
मुलींचे गुणोत्तर
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न होत असताना महिला संसाराला हात लावत नसल्याने स्त्री भ्रूण हत्या होते. मात्र त्यात आता सुधारणा झाली आहे. एक हजार पुरुषांमागे ९१४ मुली आहेत़ ही मोठी मिळकत आहे. मुलींना शिक्षण, रोजगार, सुरक्षितता मिळाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना सन्मान सुध्दा मिळाला पाहिजे, त्यासाठी घरातीलच महिलांनी पुढाकार घ्यावा, असे मुंडे म्हणाल्या.