मुंबई : शेतकरी बापाच्या मुलाने शाळेत ‘अरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर केली. अन् दुर्दैव म्हणजे ज्या दिवशी मुलाने कविता सादर केली त्याच रात्री बापाने विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेनं महाराष्ट्र हळहळला. त्यानंतर, कृषी मंत्र्यांसह, गृहमंत्र्यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला. तसेच, पीडित कुटुंबीयास मदतीचे आश्वासनही दिले. आता, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत चिमुकल्याच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याचे सांगितले आहे.
शेतात राबराब राबणाऱ्या बापाला त्याचा चिमुकला लेक रोज भरल्या डोळ्याने पाहत होता. बापाचे हेच कष्ट त्याने शब्दबद्ध केल. अन् ‘अरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर केली. मात्र, लेकाची आर्त हाक बापाला ऐकायलाच गेली नाही. कारण, मुलाने शाळेत कविता केली, त्याचदिवशी शेतकरी बापाने विष पिऊन आत्महत्या केली. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या गावात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, ''माझ्या मावशीचे पती यांचे निधन झाले असल्याने मी यावर पूर्वी टिप्पणी नाही केली. पण बातमी पाहिली.. प्रशांत मल्हारी बटुळे या मुलाने "नको करू आत्महत्या बळीराजा" ही हृदयद्रावक कविता शाळेत गायली आणि 2 तासात त्याच्या पित्याने आत्महत्या केली. मन सुन्न झाले .. कविता ऐकून ही दुर्दैवी घटना टळली असती तर बरं झालं असतं.!
या चिमुकल्याची कविता इतर शेतकरी बांधवांना अशा चुकीच्या विचारांपासून परावृत्त करो व मल्हारी बटुळे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.!!, असे पंकजा यांनी म्हटले आहे. तसेच, भारजवाडी या गावी मी या कुटुंबाला लवकरच भेट देणार आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या पाथर्डी परीसरातील या दुर्दैवी परीवाराला मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे छोटीशी मदत म्हणून 51 हजार प्रत्येक मुलाच्या नावे आणि 51 हजार रुपये पत्नीच्या नावे देत असल्याचे पंकजा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मल्हारी बाबासाहेब बटुळे (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतक-याचे नाव आहे. भारजवाडी येथील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी (दि़.२७) मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कविता वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मृत मल्हारी यांचा मुलगा प्रशांत हा इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेतो. ‘बळीराजा’ आत्महत्या करू नको.. असे आवाहन करणा-या प्रशांतचा आवाज मात्र त्याच्या बापापर्यंत पोहोचला नाही़. प्रशांतचे वडील मल्हारी बटुळे यांनी गुरुवारी रात्री विष पिऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणामुळे मल्हारी यांनी आत्महत्या केल्याची गावात चर्चा आहे.