कोपरगाव : पालकांनी आपल्या पाल्यांना चंदेरी दुनियेत जाण्याचा आग्रह न धरता रंगभूमीच्या सर्व अंगांची माहिती करून घेण्यासाठी प्रयत्नशील रहावे. मात्र, हे करताना आपल्या मुलांकडून माफक अपेक्षा ठेवा आणि मुलांचं बालपण हिरावून घेऊ नका, असे मत मराठी सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी व्यक्त केले.
कोपरगाव शहरात संकल्पना फाऊंडेशन व लद्दे ड्रॅमॅट्रिक्स स्कूल यांच्यावतीने शहरातील बालकलाकारांना नाट्य अभिनयाचे शिबिराद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. या शिबिराच्या माध्यमातूनच बाल कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी मराठी अभिनेते सिद्धार्थ जाधव हे शनिवारी कोपरगावात आले होते.
जाधव म्हणाले, समाजात वावरत असताना मनमोकळा संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कला गुणांना अधिक वाव मिळत असतो. आयुष्यात स्वतःवर प्रेम करा, जग आपोआप तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. तसेच आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या आई-वडिलांना दुय्यम स्थान देऊ नका व आयुष्यभर निर्व्यसनी राहण्यासाठी प्रयत्न करा. जीवनात निश्चितच आनंदी रहाल याची मी खात्री देतो.
यावेळी संकल्पना फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मयूर तिरमखे, डॉ. योगेश लाडे, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, डॉ. संतोष तिरमखे, प्रा. किरण लद्दे, संस्थेचे सचिव गणेश सपकाळ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेतन गवळी, रोहित शिंदे, सागर पवार, गजानन पंडित, वैभव बिडवे, कल्पना सपकाळ, प्रा. कल्पना निंबाळकर, सुनीता इंगळे, आरती सोनवणे, मधुमिता निळेकर, सोनिका सोनवणे, शीतल पंडीत, नरेंद्र मगर, श्रीकांत साळुंके, नवनाथ सूर्यवंशी, दत्तात्रय गुंजाळ, डॉ. कविता गुंजाळ यांनी परिश्रम घेतले.