लोकमत न्यूज नेटवर्ककरंजी (जि. अहमदनगर) : सत्तेसाठी आपले तिसरे अपत्यच नाकारणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी (शिराळ) येथील सरपंच अनिता एकनाथ आटकर व माजी उपसरपंच एकनाथ आटकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका देत अनिता आटकर यांचे सरपंचपद रद्द केले आहे़ कोर्टाच्या निर्णयामुळे एकनाथ आटकर यांचे ग्रामपंचायतीचे सदस्यत्वही धोक्यात आले आहे़ २०१३ साली झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकनाथ आटकर व त्यांच्या पत्नी अनिता यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी तिसरे अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते़ छाननीच्यावेळी विरोधी उमेदवार व गटाचे प्रमुख प्रल्हाद आव्हाड व इतरांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आटकर यांना तिसरे अपत्य असल्याची तक्रार केली होती़ आटकर यांना तीन अपत्य असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली होती़प्रल्हाद आव्हाड व सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली़ परंतु तेथील वेळकाढूपणामुळे त्यांनी नाशिक येथील आयुक्तांकडे तक्रार केली़ आयुक्तांनी एकनाथ आटकर यांना अपात्र ठरविले़ आयुक्तांच्या निर्णयाविरोधात आटकर यांनी उच्च न्यायालयात अपील केले़ उच्च न्यायालयाने नाशिकच्या आयुक्तांचा निकाल कायम ठेवला़ त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता.
पदासाठी दाम्पत्याने नाकारले पितृत्व!
By admin | Published: May 08, 2017 4:27 AM