चंद्रकांत शेळके अहमदनगर : एकीकडे वृद्ध आई-वडिलांना अनाथाश्रमाची वाट दाखवली जात असली तरी भारतीय समाजात श्रावणबाळदेखील काही कमी नाहीत. शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील वैद्य बंधूही त्यापैकीच एक. त्यांच्या आई-वडिलांची इच्छा आहे की उर्वरित आयुष्य काशीला घालवून देह तेथेच ठेवावा. त्यामुळे गावाला, नातेवाईकांना कायमचा निरोप देऊन या वृद्ध दाम्पत्याला काशीला नेण्याची सोय वैद्य बंधूंनी केली आहे. येत्या १६ जून रोजी हे दाम्पत्य खास हेलिकॉप्टरने काशीला रवाना होणार आहे.
शिवलिंग वैद्य (वय १०४) व सीता वैद्य (वय ९५) असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव. त्यांना सीताराम (वय ६८), सुभाष (वय ६५), महालिंग (वय ६२) व मंदाकिनी (वय ५८) अशी चार मुले. शेती करून त्यांनी मुलांना वाढवले. मोठे चिरंजीव सीताराम हे रेल्वेत, तर सुभाष वैद्य हे रिझर्व्ह बँकेत नोकरीस होते, तर लहान मुलगा महालिंग यांनी गावाकडे शेती सांभाळली.
वारकरी वारसा असल्याने शिवलिंग यांनी महिन्याला एकदा पैठण आणि दोनदा पंढरपूर कधी चुकवलं नाही. मुलांनी संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रे दाखवली. ज्ञानेश्वरीची पारायणे इतकी झालीत की ती आता पाठ झाली आहेत. आयुष्याचे शेवटचे दिवस काशी विश्वेश्वराच्या साधनेत घालवायचे आणि तेथेच देह ठेवायचा, अशी इच्छा शिवलिंग यांनी मुलांना बोलून दाखवली. जन्मभूमी सोडून दुसरीकडेजायचं आणि तेही कधी परत न येण्यासाठी, यावर नातेवाईकांचा, ग्रामस्थांचा विश्वास बसेना. परंतु शिवलिंग दाम्पत्य निर्णयावरठाम आहेत. त्यामुळे मुलांनीही आई-वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले.हेलिकॉप्टरसाठी १४ लाखांचा खर्चशहरटाकळी येथे यानिमित्त वैद्य बंधूंनी आई-वडिलांचा भव्य निरोप समारंभ आयोजित केला आहे. १६ जून रोजी भव्य मिरवणुकीने शिवलिंग व त्यांची पत्नी सीताबाई यांना निरोप देण्यात येणार आहे. वैद्य दाम्पत्य शहरटाकळी येथून खास हेलिकॉप्टरने मुंबई वतेथून विमानाने काशीला जाणार आहेत. हेलिकॉप्टरसाठी १४ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. काशीला राहण्यासाठी त्यांनीएक खोली घेतली असून आता या दाम्पत्याची अखेरही काशीतच होणार आहे.