पारनेर : पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उपसभापती विलास झावरेंसह नऊ संचालकांनी राजीनामे दिले आहे. त्यांनी गुरुवारी रात्री सुजित झावरे यांच्याकडे राजीनामे दिले. आता सभापती गायकवाड काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना राजीनामा देण्यास सांगावे यासाठी सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली काही संचालकांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीच्या नंतर यात बदल करून घेण्याचा विचार सुरू होता. सभापती गायकवाड यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींनी कोणताही निर्णय घेतला नसल्याने गुरुवारी सायंकाळी नगर येथे सुजित झावरे यांच्या निवासस्थानी गंगाराम बेलकर, राजेश भांडारी यांच्यासह नऊ संचालक एकत्र आले. त्यांनी सभापती गायकवाड यांनी राजीनामा द्यावा यासाठी सर्वांनी राजीनामे द्यावेत, असा निर्णय घेण्यात आला. नऊ संचालकांनी निबंधकांच्या नावाने लिहिलेले राजीनामे सुजित झावरे यांच्याकडे दिले आहेत.बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना राष्ट्रवादीने तीन वर्षे संधी दिली आहे. इतर संचालकांना संधी मिळावी म्हणून त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. सभापती राजीनामा देत नाहीत म्हणून संचालकांनी माझ्याकडे राजीनामे दिले आहेत. -सुजित झावरे, राष्ट्रवादीचे नेते, पारनेर
पारनेर बाजार समिती : उपसभापतीसह नऊ संचालकांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 5:11 PM