पारनेर : पारनेर येथे नगरपंचायतीच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रभागांमध्ये आरक्षण ठरविण्यासाठी जातीनिहाय लोकसंख्या माहिती मागविली आहे. याबाबत येत्या पंधरा दिवसात माहिती संकलन होऊन पुढील कार्यवाही होईल.तालुकास्तरावरील गावांमध्ये ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानंतर नगरपंचायतसाठी हरकती मागविण्यात आल्यानंतर पारनेर ग्रामपंचायतीने त्याला हरकत घेऊन सध्या ग्रामपंचायतीचे अस्तित्व ठेवावे, अशी मागणी केली होती. तर राष्टवादीच्या पारनेरमधील युवक नेत्यांनी नगरपंचायतमुळे कर वाढणार असेल तर नगरपंचायत नको, परंतु विकास कामे होणार असतील तर नगरपंचायत करावी, असे म्हटले होते. दरम्यान, पारनेर येथे ग्रामसभा घेण्यात आली. मात्र सभेत गोंधळ झाल्याने निर्णय झाला नाही. परंतु तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपंचायती च्या प्राथमिक हालचाली करताना पारनेर येथील बुगेवाडी, तराळवाडी, कुंभारवाडी, सोबलेवाडी, महाजन मळा, वरखेड मळा यासह परिसरातील वाड्या-वस्त्यांची माहिती मागविली. त्यानुसार किती लोकसंख्या आवश्यक आहे याची माहितीही संकलीत केली. नंतर जिल्हा परिषदेनेही पारनेर येथे नगरपंचायत होण्यास हरकत नसल्याचे सांगितले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा माहिती संकलन करताना प्रभागातील जातीनिहाय आरक्षण ठरविण्यासाठी आता गावातील प्रभाग व त्यामधील जातीनिहाय लोकसंख्या मागविली आहे.आरक्षण ठरणारप्रभागनिहाय विविध जातींची लोकसंख्या अहवाल आल्यानंतर नगरपंचायतीचे प्रभाग किती, कोणत्या प्रभागात किती सदस्य व त्यानुसार आरक्षणही तयार करण्यात येणार आहे. सध्या पारनेर ग्रामपंचायतीत सतरा सदस्य संख्या असून सहा प्रभाग आहेत. त्यामुळे नवीन फेररचना कशी होईल, प्रभाग कसे असतील याविषयीची पुढील महिन्यात प्रक्रिया सुरू होणार आहे. विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास नगरपंचायतीची सर्व प्रक्रिया तीन महिने लांबणीवर पडेल, असे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. (तालुका प्रतिनिधी)सावध प्रतिक्रियापारनेर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला पारनेर वासीय सावध प्रतिक्रिया देत आहेत. काही जण नगरपंचायतीमुळे विकासाला चालना मिळेल असे म्हणत आहेत. तर नगरपंचायतीमुळे घरपट्टी, पाणीपट्टीत चारपट वाढ होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे. मात्र काही मोजकी मंडळी सोडल्यास नगरपंचायत होण्यास विरोधही नाही व नगरपंचायत व्हावी म्हणून त्या प्रमाणात समर्थनही नाही अशी सध्याची स्थिती आहे.
नगरपंचायतीसाठी पारनेरला हालचाली
By admin | Published: September 11, 2014 11:08 PM