पारनेर : सध्या पारनेर तालुक्यातील पारनेर शहर, सुपा, टाकळी ढोकेश्वर, मांडवे ही गावे कोरोनाची हॉटस्पॉट ठरत असून येथे अद्यापही रूग्णसंख्या कमी होत नसल्याचे दिसून येते.
पारनेर तालुक्यात सध्या दररोज २५० ते ३०० जण बाधित होत आहेत. मागील आठवड्यात तपासणी कमी असताना ही रूग्ण मात्र झपाट्याने वाढत होते. पारनेर शहरातील इंदिरानगर, शाहूनगर, बोळकोबा गल्ली, कोर्ट गल्ली, संभाजीनगर, आनंदनगर भागात रूग्णसंख्या जास्त आहे. वैदू वस्तीमधील अनेक जण बाधित झाले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू असले तरी परिसरात तातडीने प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे सुपा या मोठ्या गावात दररोज वीस ते तीस रूग्ण आढळून येत आहेत. आदर्श नगर, पवार वस्ती, दूध संघ परिसर यासह अनेक भागात रुग्णसंख्या वाढत आहे. दररोज सकाळी सुपा येथे भाजी बाजारमध्ये गर्दी होत आहे. गर्दीवर उपाययोजना करण्यासाठी पोलीस ही दुर्लक्ष करीत असून नागरिक ही गर्दी करून निष्काळजीपणा करत आहेत. टाकळी ढोकेश्वर, मांडवे खुर्द, निघोज, वडझिरे, अळकुटी,जवळा, गांजीभोयरे, हंगा, कान्हूर पठार येथेही रुग्णसंख्या वाढत आहे.
----
पारनेर तालुक्यात रूग्णांची संख्या वाढत असून लोकांना जबाबदारीने वागावे, विनामास्क फिरू नये. काही प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास तातडीने तेथील आरोग्य केंद्रावर संपर्क करावा.
-डॉ. प्रकाश लाळगे,
तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर