लोकमत विशेष
आरोग्याची असुविधा भाग २
पारनेर : एखाद्या रुग्णावर तातडीने उपचारासाठी लागणारे अतिदक्षता विभाग, त्यातील हृदयविकारासह वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टरच पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यात नाहीत. त्यामुळे पारनेरकरांचे आरोग्य नगर, पुणे, मुंबई येथील डॉक्टरांच्या हातात असल्याचे दिसून येते.
पारनेर तालुक्यातील वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे समोर येत आहे. तालुक्यात हृदयविकारासह अपघातानंतर होणाऱ्या आजारांवर उपचार करणारा तज्ज्ञ डॉक्टर एकही उपलब्ध नाही. काही बोटावर मोजण्याइतकेच आहेत, तर ते शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात. तज्ज्ञ डॉक्टर आणि अतिदक्षता विभाग (आयसीयू) कक्ष नसल्याने व अनेक आरोग्य सुविधा नसल्याने अनेक रुग्णांना नगर, पुणे, संगमनेर, मुंबईत उपचारासाठी न्यावे लागते. ऐनवेळी मोठे आजार झाले तर त्यांचे भवितव्य या मोठ्या शहरामधील डॉक्टरांवरच अवलंबून असल्याचे दिसून येते.
---
केवळ दहाच एमबीबीएस डॉक्टर
पारनेर ४, सुपा ३, कान्हूर पठार १, निघोज १, टाकळी ढोकेश्वर १ असे बोटावर मोजण्याइतकेच म्हणजे आठच एमबीबीएस डॉक्टर तालुक्यात असल्याचे पाहणीमध्ये आढळून आले.
---
चार ठिकाणीच परिपूर्ण सुविधा
अतिदक्षता विभाग, एक्स-रे, तातडीचे काही उपचारासाठी सुविधा अशा काही सुविधा असणारे सुपा येथे दोन, पारनेर दोन, भाळवणीत एक एवढ्याच ठिकाणी सुविधा असल्याचे दिसून आले. मात्र विशेष तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने प्राथमिक उपचार करून रुग्णांना येथून नगर, पुणे येथील मोठ्या रुग्णालयात पाठविले जाते.
--
निघोज, जवळा, अळकुटी, वडझिरे, वाडेगव्हाणला केवळ तपासणी केंद्र
तालुक्यात पारनेर, सुपा, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर येथे काही प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. मात्र तालुक्यात धनाढ्य समजले जाणारे आणि पाणी असणारे निघोज, वडझिरे, वाडेगव्हाण, अळकुटी, जवळा भागात तर अत्याधुनिक सुविधा असणारी मोठी हॉस्पिटल नाहीत. येथील रुग्णांना शिरूर, आळे फाटा, पुणे या ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. येथेही फक्त प्राथमिक उपचार होतात.