अमहदनगर : पारनेर तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पारनेरचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सेवाभावी निलेश लंके यांना या निवडणुकीत निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले. विजयादशमीनिमित्त मंगळवारी पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी पवार पुढे म्हणाले, या निवडणुकीत उमेदवाराला लोक आर्थिक मदत करतात हे मी पहिल्यांदाच पाहिले आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी पारनेरला मी एमआयडीसी सुरू केली. पारनेरमध्ये मी लंके यांच्या रुपाने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिला आहे. त्यांना संधी द्या. पाणी प्रश्नांसह विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या माध्यमातून यापुढील काळात प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. जे पक्ष सोेडून गेले, त्यांना जाऊ द्या. पवार कुटुंबावर कितीही संकेट आली तरी आम्ही लढत राहणार आहोत. सरकार शेतकºयांच्या प्रश्नावर गंभीर नाही. आमच्या सरकारने शेतक-यांना ७८ कोटींची कर्जमाफी दिली. मात्र भाजप-सेनेच्या सरकारने फसवी कर्जमाफी केली. सरसकट कर्जमाफी कुणालाच मिळाली नाही. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके म्हणाले, आज विजयादशमीनिमित्त पवार हे माझ्या प्रचार शुभारंभासाठी पारनेरमध्ये आले आहेत. मी पवार साहेबांचा उमेदवार आहे. यामुळे या निवडणुकीत मी रावण दहन केल्याशिवाय राहणार नाही.
पारनेरचा पाणी प्रश्न सोडविणार-शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 2:13 PM