राहुरी बस स्थानकाची इमारत १९७३ साली बांधण्यात आली. मागील अठ्ठेचाळीस वर्षात इमारतीची वेळोवेळी देखभाल दुरुस्तीची कामे झाली नाहीत. त्यामुळे बसस्थानकाची इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. वाहतूक नियंत्रण कक्षातील स्लॅब फुगलेला असून काही भाग पडल्याने स्लॅबचे गंजलेले गज उघडे पडले आहेत. व्यापारी गाळे, बंद पडलेल्या उपहारगृहाची दैनावस्था झाली आहे. राहुरी बसस्थानकातील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. बसच्या चालक वाहकांच्या निवास व्यवस्थेची खोली कोसळण्याच्या भीतीने वापर बंद आहे.
प्रवाशांच्या प्रतिक्षालयाचे पत्र्याचे शेड सुस्थितीत असले तरी पावसाळ्यात गळत असल्याने प्रतिक्षालयात पाणीच पाणी होते. बसस्थानक आवारात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सुलभ शौचालयात घाणीच्या तीव्र वासाने प्रवाशांचा श्वास गुदमरतो. बस स्थानक परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.