अहमदनगर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकाचे पक्ष म्हटले जातात. पण वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात, तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे सोपे आहे, असे सांगत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.
संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना आगामी निवडणुकांचे संकेत देत मित्रपक्षांशी अशीच दोस्ती कायम असणार का? असा सवाल केला.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही युतीत असलो तरी खरे फॅमिली फ्रेंड आहोत. मित्र काँग्रेस-राष्ट्रवादीत होते. विलासराव देशमुखांनी कधीही 'ग्रेस' सोडली नाही. आम्ही विरोधात असतानाही त्यांच्यासोबतच आहोत, असे वाटायचे. याशिवाय शरद पवार साहेब आणि माझे आजोबा (बाळासाहेब ठाकरे) यांची मैत्री जगजाहीर आहे. या मैत्रीत वेगळच प्रेम होते. आता आमचेही वेगळे नाते निर्माण झाले आहे."
(...तर जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही; शरद पवारांनी रोहितला दिला होता सल्ला)
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकाचे पक्ष म्हटले जातात. पण वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात, तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी मैत्री, नाती एकत्र आली आहेत. महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही बदल घडला आहे. देशाचे चित्र बदलायला लागले आहे. भविष्यात आणखीच बदल घडेल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यावरून असे लक्षात येते की, राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांपाठोपाठ आगामी मुंबईसह इतर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी राहुल गांधींना भेटलो, त्यांच्याशी बोललो. विचार वेगळे असतील. मात्र विकास हे ध्येय समान आहे.
('मला आदित्यच म्हणत जा, साहेब वगैरे म्हणू नका!')
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनाही आगामी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याचे संकेत दिले आहे. जे समीकरण आत्ता झाले आहे, ते एका विचाराचे आहे. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि विलासराव देशमुख यांच्या मनात कदाचित हे समीकरण असेल. पण, त्यांच्यापैकी कोणी बोलले नसावे. मात्र, ज्या गोष्टी त्यांचा मनात होत्या, त्या तीन महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेऊन केल्या, असे रोहित पवार म्हणाले. याशिवाय, लोकांची सत्ता आहे. तिन्ही पक्षांची मनं एकत्र आली आहेत. पुढच्या काळातील निवडणुका म्हणजे सर्वसामान्यांना योग्य असे समीकरण असेल. अहंकारी विचाराला आम्ही सगळ्यांनी मिळून पाडले. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असे समीकरण जुळू शकते, असे रोहित पवार यांनी सांगितले.
आणखी बातम्या..
संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन
गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप
मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे
इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण