हरिहर गर्जे । पाथर्डी : बारावीची परीक्षा मंगळवारी सर्वत्र सुरु झाली. पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांसाठी कॉपी रॅकेटमधून हमखास पासिंग फॉर्म्युला राबविण्यात येत असल्याचे चित्र पाथर्डी तालुक्यात दिसले. मित्र कंपनी, पालक देखील बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यात व्यस्त होते. परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातील वाहने व विद्यार्थी पाथर्डीत दाखल झाले आहेत. बारावी परीक्षेसाठी पाथर्डी तालुक्यातील १० परीक्षा केंद्रातून ६ हजार २८७ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. शहरासह तालुक्यात बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका अवघ्या ३० मिनिटात पोलीस ठाण्याच्या समोरील झेरॉक्स सेंटरवर आली होती. तेथे उत्तर पत्रिका घेण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. बाबूजी आव्हाड महाविद्यालयात बाहेरून पोलीस बंदोबस्त होता. मात्र महाविद्यालयाच्या मागील गेटमधून काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुख्य इमारतीच्या शेजारील खोल्यामध्ये उत्तर पत्रिकाच्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना वाटत होते. वसंतदादा, एम.एम.नि-हाळी विद्यालयात कॉपी पुरवणाºया युवकांची मोठी गर्दी होती. अपुरा पोलीस बंदोबस्ताचा फायदा घेत पोलिसांना न जुमानता काही युवक परीक्षार्र्थींना कॉपी पुरवत होते. परीक्षा केंद्राबाहेर राज्यातील विविध जिल्ह्याच्या पासिंग असलेल्या चारचाकी अलिशान वाहनाच्या रांगा होत्या. त्यामुळे परीक्षा सुरु होताना व संपल्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती. श्रीतिलोक जैन विद्यालयात तहसील कार्यालयाच्या आवारातून पोलीस मित्राच्या मदतीने महिला पालक देखील आपल्या पाल्याला कॉपी पुरवत होते. तनपुरवाडी येथील न्यू भगवान आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज परीक्षा केंद्रात महसूल विभागात नोकरीला असलेला भरारी पथकातील कर्मचारी चक्क शिक्षकांना कॉपी पुरविण्याच्या सूचना देत होता. काही कर्मचारी परीक्षा केंद्राच्या गेटवर येऊन पालकांकडून कॉपी घेऊन ती विद्यार्थ्यांना पुरवत होते. या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाºया हुल्लड युवकांच्या आरडाओरड्यामुळे परीक्षा केंद्राला जत्रेचे स्वरूप आले होते. खिडक्याच्या बाहेर अक्षरश: पुस्तकांचा व कॉपीचा खच पडला होता. बारावी परीक्षेमुळे शिक्षण संस्थांसह हॉटेल, लॉज, बिअरबार या व्यवसायांना चांगले दिवस आले आहेत, असे चित्र पाथर्डीत होते.कॉपी करण्यास सहकार्य करणा-या संस्थांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळवला जाणार आहे. कॉपी थांबविण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्यात येतील, असे पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी सांगितले.
पाथर्डीत राबतोय कॉपी रॅकेटमधून पासिंग फॉर्म्युला; बारावी परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 4:09 PM