मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : सामाजिक न्याय विभागाने केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या धर्तीवर महाराष्टÑातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार ज्येष्ठांची वयोमर्यादा ६० वर्षे ठरविण्यात आली आहे. पण सरकारच्या दोन विभागांमध्ये ताळमेळ नसल्याने महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.मध्ये पासष्टीलाच ही सवलत लागू आहे. त्यामुळे साठीतील ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे.तत्कालिन सामाजिक न्याय मंत्री डॉ. राजकुमार बडोले यांनी राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या ठरविताना ‘ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा स्त्री/पुरूष व्यक्तींना ‘ज्येष्ठ नागरिक’ म्हणून संबोधण्यात येते’ असे सामाजिक न्याय विभागाने हे धोरण जाहीर करताना स्पष्ट केले. मात्र राज्य सरकारचा स्वतंत्र उपक्रम असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसमध्ये मात्र अजूनही ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वर्षे असेच गृहित धरण्यात येते. त्यामुळे राज्य सरकारने ६० वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांचा ज्येष्ठ नागरिक म्हणून समावेश केला असला तरीही महामंडळाकडून ६० वर्षांच्या नागरिकांना ज्येष्ठाचा दर्जा देण्यात आलेला नाही. राज्याच्या ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवास करताना बस भाड्यात सवलत मिळण्यासाठी ओळखपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार असे ओळखपत्र असले तरी ६० वर्षांच्या ज्येष्ठांना एस. टी. मध्ये प्रवास भाड्यात सवलत मिळत नाही. सामाजिक न्याय विभाग ६० वर्षांच्या नागरिकांना ज्येष्ठ म्हणत असताना एस. टी. महामंडळ मात्र ६० वर्षांच्या नागरिकांना ज्येष्ठ म्हणायला तयार नाही.६० वर्षांच्या नागरिकांना बस प्रवास सवलत देण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. -शुभांगी तिरवडकर, एस. टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या स्वीय सहायक.राज्य सरकारने दीड वर्षापूर्वीच ज्येष्ठांची वयोमर्यादा ६० वर्षे केली. त्यानुसार एस.टी.प्रवासात सवलत मिळण्यासाठी राज्यातील प्रवासी संघटनांनी पाठपुरावा केला, पण सरकारची याबाबत इच्छाशक्ती दिसत नाही. -रणजीत श्रीगोड, अध्यक्ष, महाराष्टÑ राज्य प्रवासी महासंघ.६० वर्षांच्या नागरिकांंना एस.टी. प्रवास सवलत लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही प्रतिसाद नाही. -सी. बी. गायकवाड, अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ नागरिक संघ कोपरगाव.
एस.टी.त पासष्टीलाच सवलत; साठीला ठेंगा: ज्येष्ठ नागरिक धोरणाला ब्रेक
By मिलिंदकुमार साळवे | Published: June 21, 2019 1:14 PM