पाथर्डी : येथील तहसील कार्यालयावर जलक्रांती जनआंदोलन संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.१९) मोर्चा काढण्यात आला.मुळा धरणाचे पाणी चारीने पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील पूर्व-दक्षिण भागाला मिळावे, यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. संयोजक दत्ता बडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलसमोरच तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तालुक्यातील अनेक गावचे शेतकरी, तरुण सहभागी झाले होते. दोन्ही तालुक्यातील वंचित भागातील कायमस्वरुपी दुष्काळ निवारण करण्यासाठी मुळा धरणाचे पाणी मिळावे. पाईप अथवा चारीने पाणी सोडण्याची योजना तयार करावी. यासाठी चालू पावसाळी अधिवेशनात आमदार राजळे यांनी प्रश्न मांडून आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी निधी मंजूर करून घ्यावा. अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही राजळे यांना मते देणार नाही, असा इशारा दत्ता बडे यांनी यावेळी दिला.बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष अॅड. सतीश पालवे यांनी मोर्चामध्ये वांबोरी चारीचा नकाशा हातात घेतला. चारी पूर्ण क्षमतेने सुरू व्हावी, अशी मागणी केली. तालुक्यातील पूर्व भागाला जाणीवपूर्वक पाणी देण्याचे टाळले जात आहे. दोन्ही तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी पाटपाणी आले पाहिजे, असे आवाहन भाजयुमोचे अमोल गर्जे यांनी केले.यावेळी रा. प. शिरसाठ, किसन आव्हाड, राहुल कारखेले, संजय दौंड, भागवत पाखरे, बाबासाहेब वाघ, अनिल जवरे, बाजीराव कीर्तने, अमोल कराड, अवि बडे, शिवहरी ढाकणे, अनिल खेडकर, भास्कर दराडे, शुभम बडे, सुदर्शन बडे, रामनाथ बडे, शैलेंद्र जायभाये, गणेश गोल्हार, बाबासाहेब वाघ, मधुकर आव्हाड, विठ्ठल हाके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.