करंजी: पाथर्डी तालुक्यातील शिराळ (चिचोंडी) येथे गुरुवारी रात्री पडलेल्या दरोड्यात पाच जणांना जबर मारहाण करण्यात आली आहे. तर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दरोडेखोरांच्या तीन मोटारसायकली सुद्धा संतप्त ग्रामस्थांनी जाळून टाकल्या आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शिराळ येथील जनाबाई छगन घोरपडे यांच्या घरी गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पाच मोटारसायकलवरुन नऊ-दहा दरोडेखोर आले. त्यांनी हातामध्ये असलेल्या दांडके, वायरच्या सहाय्याने घोरपडे यांच्या घरातील व्यक्तींना जबर मारहाण केली. घरातील कपाट, पेट्या उचकून जीपगाडीखाली घरामध्ये ठेवलेले दोन लाख रुपये रोख व सोने असा ऐवज लंपास केला. या दरोड्यामध्ये जनाबाई घोरपडे यांच्यासह रवींद्र छगन घोरपडे, शाम घोरपडे, दत्तू आजमाने, संगीता घोरपडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराची माहिती ग्रामस्थांना समजताच गावातील लोक पटकन मदतीला धावले. त्यानंतर ग्रामस्थांनी दोघा दरोडेखोरांना पकडले. त्यांना चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी काही दरोडेखोर मात्र तेथून पळून गेले. त्यांच्या तीन मोटारसायकल संतप्त ग्रामस्थांनी भर रस्त्यात जाळून टाकल्या. या प्रकाराची माहिती समजताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, इंद्रभान सरोदे फौजफाट्यासह घटनास्थळी रात्रीच दाखल झाले. जखमी सर्व व्यक्तींना नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या संदर्भात दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत रवींद्र छगन घोरपडे यांनी दरोडा घालून जबर मारहाण केल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली आहे. (वार्ताहर)
पाथर्डीत दरोडा
By admin | Published: May 30, 2014 11:31 PM