अहमदनगर : पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पाथर्डीच्या पोलीस निरीक्षकांनीच काही व्यक्तींशी संगनमत करत कट रचला, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पाथर्डीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांची तडकाफडकी बदली केली आहे.किसन आव्हाड व त्यांच्या पत्नी शालिनी आव्हाड यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना निवेदन दिले होते़ फोनवर संभाषण करणारे पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण तर दुसरा व्यक्ती हा विजय आव्हाड (पाथर्डी) असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. राजेंद्र चव्हाण व विजय आव्हाड यांच्यात गत १० जानेवारीला रात्री ११ वाजेच्या सुमारास फोनवर संभाषण झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. स्पिकर फोनवर हे संभाषण झाले असल्याने ते स्पष्टपणे ऐकू येते. पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व विजय आव्हाड यांनी संगनमत करत आपणाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचला होता. १० जानेवारीला गेवराई तालुक्यातील काही महिलांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत ही फिर्याद दाखल केली जाणार होती. या महिला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आल्याही होत्या. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांना त्यांच्या माहितीत तफावत आढळल्याने गुन्हा दाखल झाला नाही, असे या तक्रारी आव्हाड यांनी म्हटले आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चव्हाण यांची तातडीने मानवी तस्करी प्रतिबंधक विभागत बदली करण्यात आली आहे.