पाथर्डी : तालुक्यातील करोडी येथे पाथर्डी - बीड राज्य महामार्गावर आम आदमी पार्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.तालुक्यात चालू वर्षासह गेल्या तीन वर्षापासून पुरेसा पाऊस झाला नसल्याने जळालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. पिक विमे मंजूर करण्यात यावेत. करोडी पाझर तलावातील गळती थांबण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. मुळा, जायकवाडी धरणाचे पाणी पूर्व भागातील शेतीसाठी मिळावे. शेतीमालाला हमी भाव देण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी आंदोलकांनी पाथर्डी - बीड मार्गावर शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले.किसन आव्हाड यांनी सरकारवर टीका केली. तालुक्यामध्ये मागील तीन वर्षापासून दुष्काळ असून जनावरांना पाणी व चारा नाही. उसाला हुमणी अळीने पोखरून टाकले आहे. पावसाअभावी फळबागा व पेरणी केलेला खरीप पिके जळून गेले असल्याने त्याचे त्वरित पंचनामे करण्यात येवून तालुका दुष्काळी जाहीर करून चारा छावण्या सुरु कराव्यात. विकास खेडकर म्हणाले, दुष्काळाने जनता होरपळत असताना सुशीक्षित बेरोजगाराच्या हाताला काम नाही. महागाई वाढली असून शेतक-यांचे जगणे मुश्कील झाले आहे. हे ओळखून शासनाने शेतक-यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी केली. अचानक झालेल्या रास्तारोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.आंदोलनात आमआदमी पाटीर्चे किसन आव्हाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास नागरगोजे, प्रमोद आंधळे, आमीर शेख, तौफिक पठाण, रा.पा.शिरसाठ, डॉ.विजयकुमार पालवे, करोडीचे सरपंच येसूबा गोल्हार, बाबुराव खेडकर, रामदास खेडकर, बाळासाहेब भाबड, गणेश खेडकर यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा : शेतक-यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 4:50 PM