विरोधी नगरसेवक आक्रमक : रस्त्यांच्या कामांना आक्षेपपाथर्डी : पाथर्डी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत रस्ते अनुदानांतर्गत प्रस्तावित रस्त्यांच्या कामावरुन प्रचंड गदारोळ होऊन अखेर सभा तहकूब करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेंद्र उदमले होते. पालिकेला शासनाकडून रस्ते अनुदानांतर्गत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरात कामे करावयाची होती, परंतु सत्ताधाऱ्यांनी ठराविक प्रभागातील कामे प्रस्तावित केल्याचा आरोप नगरसेवक बजरंग घोडके, माजी नगराध्यक्ष जनाबाई घोडके, डॉ. दीपक देशमुख, चाँद मणियार, डॉ. संजय उदमले यांनी करुन या कामाला विरोध दर्शविला. प्रभाग चारमध्ये पेव्हींग ब्लॉक बसविण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. हे काम नेमके कोणत्या ठिकाणी करावयाचे, याचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे या कामाला आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर या कामाच्या अंदाजपत्रकाची मागणी नगरसेवकांनी केली. अंदाजपत्रक पाहिल्यानंतर कामाचा उल्लेख नसल्यामुळे एका नगरसेवकाने सदर अंदाजपत्रकच फाडले. ‘पालिकेच्या इंजिनिअरला बोलवा’ अशी मागणी काही नगरसेवकांनी केली, परंतु इंजिनिअर रजेवर असल्याचे सांगण्यात आले. इंजिनिअर नसल्याने याविषयीची माहिती कोण देणार? असा प्रश्न विरोधी नगरसेवकांनी उपस्थित केला. ठराविक प्रभागातील कामे घेतल्यामुळे आमचा या कामाला विरोध आहे, असे नगरसेवक बजरंग घोडके यांनी स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)रस्त्याच्या कामांना आक्षेपआमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून सदर निधी उपलब्ध झाला असून सर्व नगरसेवकांनी कामे सुचविली होती, परंतु मंगळवारच्या सभेत ठराविक प्रभागातील कामे दाखविल्यामुळे गदारोळ झाला. सर्व प्रभागात निधी देण्यासाठी सर्व नगरसेवकांच्या शिफारशी घेण्यात आल्या होत्या. तरी ठराविक ठिकाणची कामे का दाखविण्यात आली, असा आक्षेप नगरसेवकांनी घेतला. त्यामुळे सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली.
पाथर्डीच्या पालिका सभेत गदारोळ
By admin | Published: May 03, 2016 11:38 PM