श्रीगोंदा : शहरात म्युकरमायकोसिसचा रुग्ण आढळला आहे. त्याला उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
म्युकरमायकोसिस आजाराची लागण झालेली व्यक्ती शहरातील अत्यंत सर्वसामान्य घरातील आहे. त्या व्यक्तीला या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नगर येथे उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी या उपचारासाठी मोठी रक्कम सांगितली. त्या रुग्णासह त्याच्या नातेवाइकांचीही आर्थिक स्थिती बेताचीच आहे. त्यामुळे त्यांना हा खर्च करणे परवडणारे नाही. त्यांनी ही बाब राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांच्या निदर्शनास आणून दिली. शेलार यांनी आजाराचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला. टोपे यांनी पुणे येथील ससून रुग्णालयाचे डीन डॉ. तांबे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी श्रीगोंदा येथील रुग्णावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.