कोपरगाव : ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर युनिट इमारतीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया आपण आमदार असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी अंतिम टप्प्यात आणून ठेवली होती. गेल्या वर्षभरापासून विद्यमान आमदारांनी सरकारकडे काहीच पाठपुरावा केला नाही. त्यामुळे कोरोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची टीका, भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये ट्रामा केअर युनिटची उभारणी करावी, म्हणून माझ्या कार्यकाळात मी तत्कालीन आरोग्यमंत्री यांचेकडे सतत पाठपुरावा केला होता. कोपरगावात शैक्षणिक संस्था, सहकारी साखर कारखाने व औद्योगिक वसाहत यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने दुर्दैवाने अपघात झाल्यास तातडीने अपघातग्रस्तांना उपचार मिळण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे ट्रामा केअर युनिट व्हावे, म्हणून तत्कालीन आरोग्यमंत्री यांचेकडे मागणी केली. सर्व कागदपत्रीय सोपस्कार पूर्ण करत सुमारे ९ कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर यांनी सादर केलेले आहे. आचारसंहितेपूर्वी अंतिम टप्प्यात आलेली ही प्रक्रिया पूर्ण करून ट्रामा केअर युनिट इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, विद्यमान आमदारांकडून जनतेच्या जीवनमरणाशी संबधित असलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे, असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.