अहमदनगर : जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात (क्वारंटाईन) ठेवलेल्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असून या व्यक्तींना शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि इतर इमारतींमध्ये विलगीकरण करुन ठेवण्यात आले आहे. या कक्षातील व्यक्तींना बाहेरचे जेवण देण्यास बंदी असून नातेवाईक व अभ्यंगतांनाही रूग्णाला भेटण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आणि बाहेरील व्यक्तींचा संपर्क टाळण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश जारी केले असून क्वारंटाईन कक्षासाठी इनचार्ज आॅफिसर नेमावा आणि बाहेरील व्यक्तींना प्रतिबंध करावा तसेच कुठल्याही प्रकारचे बाहेरचे खाद्यपदार्थ व भोजन देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्वारंटाईन कक्षासाठी इनचार्ज आॅफिसरची नेमणूक करावी. या इनचार्ज आॅफिसरने संबंधित ठिकाणाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची योग्य दक्षता घ्यावी. या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत नेमलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणालाही निरीक्षणाखाली ठेवलेल्या व्यक्तीस भेटण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.