कोपरगाव : येथील संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने सुरू केलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये उत्कृष्ट नियोजन केलेले आहे. तेथे वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चितच मदत होणार आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने सुरू केलेल्या कोविड सेंटरला प्रांताधिकारी शिंदे यांनी बुधवारी (दि.२८) भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते, डाॅ. वैशाली आव्हाड, संजीवनी कोविड केअर सेंटरचे समन्वयक उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, रुग्णांना निश्चितच चांगले उपचार मिळतील अशी व्यवस्था संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आली आहे. या कामासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य राहील. रुग्णाचा प्राथमिक अहवाल हा बाधित आल्यास तत्काळ संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावा. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येणारा काळ कसोटीचा आहे. ४०० बेडचे सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपचार देण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था केली असल्याचेही समाधान शिंदे यांनी स्पष्ट केले.
...........