हळगाव : जामखेड तालुक्याच्या हक्काच्या शेतीच्या पाण्याचा व एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री व संबंधित खात्यांचे मंत्री, अधिकारी यांच्याशी विविध स्तरावर बैठका सुरू आहेत. त्यासाठी निधीची उपलब्धता होण्यासाठी नियोजन सुरू आहे. पवारांना कोणाला नादी लावायला जमत नाही. पवार कामच करतात, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. सृजनच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध शासकीय योजनांच्या शिबिरांच्या महसूल मंडलनिहाय नियोजन बैठकांचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी करण्यात आले होते. त्यानुसार आमदार पवार यांनी हळगाव (ता. जामखेड) परिसरातील जनतेशी संवाद साधला. यावेळी आमदार पवार पुढे म्हणाले,मतदारसंघात विकास कामे चांगली होत नसतील तर तत्काळ मला कळवा. चांगले कामे करून घेण्यासाठीचा मी बॉस आहे. जो चांगली कामे करणार नाही त्याचा योग्य बंदोबस्त केला जाईल. पुढच्या विधानसभा निवडणुकीआधी मी केलेल्या विकास कामांचे गावागावात फलक लावले जाणार नाहीत. कारण मला मतदारसंघात जनतेच्या डोळ्यांना दिसतील अशीच कामे करावयाची आहेत, अशी मिश्कील टिप्पणी करीत आमदार रोहित पवार यांनी माजीमंत्री राम शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. नियोजन बैठक संपल्यानंतर आमदार पवार यांना निवेदने देण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. अनेक महिलांनी यावेळी निवेदन दिले.
पवारांना नादी लावायला जमत नाही, ते कामच करतात-रोहित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 5:40 PM