अहमदनगर : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात कोणतीही राजकीय फिक्सिंग नसल्याचा इन्कार करत मोदीमुक्त भारतासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे मनसेचे बाळा नांदगावकर यांनी नगर येथे स्पष्ट केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नगरसेवक गणेश भोसले, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर आदी यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे यांची पवारांशी जवळीक वाढल्याबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नांदगावकर यांनी वरील खुलासा केला. ते म्हणाले, पक्षप्रमुख राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकाच ज्येष्ठ नेते पवार यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी पवारांची मुलाखत घेतली. ही मुलाखत काही कारणास्तव रद्द झाली हाती. मात्र गुढी पाडव्यापूर्वी ती घेण्यात आली. गुढी पाडव्याच्या सभेत पक्षप्रमुखांनी मोदी मुक्त भारताची घोषणा केली. कारण देशातील जनतेची भाजप सरकारने फसवणूक केल्याचे ते म्हणाले.लोकसभा निवडणूकपर्वूी राज ठाकरे यांनी गुजरातला भेट देऊन मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता, याबाबत पत्रकारांनी छेडले असता उद्योगपती रतन टाटा यांच्या सांगण्यावरून ठाकरे यांनी गुजरात भेट दिली. गुजरातचा विकास पाहून त्यांनी त्यावेळी तशी भूमिका घेतली होती. मात्र गुजरात विकास फसवा असल्याच्या सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यामुळे मोदी मुक्त भाषणाची घोषणा ठाकरे यांनी केली असून, त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास पुढच्या राज्यातील चित्र वेगळे असेल, असे नांदगावकर म्हणाले.
पक्ष बॅकफूटवर गेल्याची कबुली
पक्ष राज्यात हळूहळू वाढणे अपेक्षित होते. मनसे राज्यात एकदम वाढल्याने कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा घुसली. त्याचा परिणाम पक्षवाढीवर झाला असून, गेल्या अडीच वर्षांत पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगून नांदगावकर यांनी पक्ष बॅकफूटवर गेल्याची कबुली दिली.