अहमदनगर : राज्य आदर्श गाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार हे देशभरातील खासदारांना ग्रामविकासावर मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी (दि.२२) पवार हे ऑनलाइन पद्धतीने खासदारांना ग्रामविकासाचे धडे देणार आहेत.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या संकल्पनेतून देशातील खासदारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जानेवारी रोजी या कार्यशाळेस प्रारंभ झाला आहे. खासदारांना त्यांच्या मतदारसंघात राबविता येतील अशा नावीन्यपूर्ण कल्पना व विकासकामे करण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, या उद्देशातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी या कार्यशाळेचा समारोप होणार आहे. हिवरे बाजार गावाने दुष्काळावर केलेली मात, पाणी व पिकाचे नियोजन, आदर्शगाव योजनेतील यशोगाथा, जलसंधारण, पर्यावरण, स्वच्छता क्षेत्रात केलेल्या कामांबाबत पोपटराव पवार खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
..................
पवारांच्या उपस्थितीत समारोप
देशभरातील पद्म पुरस्कारप्राप्त तज्ज्ञांचे खासदारांना मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. गतवर्षी पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. त्यानुसार पवार यांना २२ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.