राहुरी : मुळा सूतगिरणीच्या २२० कामगारांच्या बँक खात्यावर १ कोटी ६ लाख रुपये अदा करण्यात आले. यासह शासनाचेही ४७ लाख रुपये अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर यांनी सोमवारी दिली.
मुळा सूतगिरणी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून आपली देणी मिळावी म्हणून लढा देत होते. २००३ मध्ये सदरची संस्था बंद पडली होती. २००१ मध्ये उत्पादन प्रक्रिया थांबविल्यानंतर २००३ मध्ये ही संस्था अवसायनात निघाली होती. त्यानंतर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे कारभार सोपविण्यात आला होता. कामगारांनी औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयातून मालमत्ता विक्री करून कामगारांची देणी देण्याचे आदेश करण्यात आले. जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर यांच्या मार्गदर्शनात सहायक निबंधक गोकुळ नांगरे यांनी मुळा सूतगिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. मुळा सूतगिरणी मालकीची जमीन ई-निविदा प्रक्रिया करीत २ कोटी ५५ लाख रुपयांना कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्यात आली. सूतगिरणीच्या बँक खात्यात पैसे शिल्लक असतानाही तांत्रिक अडचणींमुळे कामगारांना पैसे वाटप होत नव्हते. याबाबत १५ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार व कामगारांनी एकत्र येत तांभेरे येथे उपोषणाला प्रारंभ केला.
या उपोषणाची दखल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर यांनी तातडीने घेत कामगारांना आश्वासन दिले. कामगारांना देणी देण्यासाठी सहायक निबंधक गोकुळ नांगरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
....
३० कामगार मयत
एकूण ४९० कामगारांपैकी २३० कामगारांच्या बँक खात्यामध्ये १ कोटी ६ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. ३० कामगार मयत असून, त्यांच्या वारसांना रक्कम दिली जाणार आहे. उर्वरित कामगारांनी तातडीने आपल्या बँक खात्याचा तपशील सहायक निबंधक विभागाकडे द्यावा, असे आवाहन सहायक निबंधक गोकुळ नांगरे यांनी केले आहे. जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर यांच्या नेतृत्वात लवकरच उर्वरित कामगारांनाही थकीत रक्का अदा होणार असल्याची माहिती सहायक निबंधक नांगरे यांनी दिली.
.....
सूतगिरणीबाबतही न्यायालयात धाव घेणार
मुळा सूतगिरणी कामगारांसाठी लढा हाती घेतला होता. शासनाने पैसे देण्यास प्रारंभ केल्याने समाधान व्यक्त होत आहे. राहुरी सूतगिरणीबाबतही न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दिली आहे.