कर्जत : रोहित पवार यांनी सोलापूर, पंढरपुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात औषधांचे वाटप करावे. मात्र अगोदर कर्जत-जामखेड मतदारसंघात औषधे वाटप करून येथील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी. येथील कोरोना रुग्णांना जीवदान द्यावे, अशी टीका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.
शिंदे यांनी गुरुवारी सकाळी कर्जत तालुक्यातील दोन्ही कोविड सेंटर व उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना रुग्णांशी संवाद साधला. त्यानंतर विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांच्याशी आरोग्य विभागातील विविध समस्या व येथे असलेला समन्वयाचा अभाव यावर चर्चा केली.
शिंदे म्हणाले, मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी रोहित पवार सध्या राज्यभर औषधे वाटप करण्यात व्यस्त आहेत. त्यांनी राज्यात सर्वत्र वाटप करावे. मात्र त्या अगोदर कर्जत-जामखेडमधील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे सत्र थांबवावे. कर्जत व गायकरवाडी येथील कोविड सेंटरची रुग्ण क्षमता व या ठिकाणी मिळत असलेल्या सुविधांबाबत मोठी तफावत आहे. याकडे लक्ष द्यायला हवे.
तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा भराव्यात. येथे विविध मशिनरी उपलब्ध आहेत. मात्र तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्या मशीनरी बंद आहेत. यामुळेच रुग्णांना सेवा मिळत नाहीत. विविध प्रकारच्या तपासणी करण्यासाठी बाहेर जावे लागते. कर्जत व गायकरवाडी येथील कोविड सेंटरमधील गर्दी कमी करण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लसीकरण करावे. गावातील प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करा. ज्या रुग्णांना उपचारांची आवश्यकता आहे. त्यांनाच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करावेत. तसेच उपजिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्र अन्यत्र हलवावे, अशा सूचना शिंदे यांनी केल्या.
यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव खेडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, नगरसेवक अनिल गदादे, अमृत काळदाते, रामदास हजारे, पप्पू धोदाड आदी उपस्थित होते.