विनाकारण फिरणारे २३२ पॉझिटीव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असताना विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही केला कमी होत नव्हती. त्यामुळे पोलीस व आरोग्य विभाभागाने थेट रस्त्यावरच चाचणी करण्याची मोहीम उघडली. गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यातील विनाकारण फिरणाऱ्या ७ हजार ८५५ नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून, यामध्ये २३२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यातील विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी काहीसी कमी झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी शहरासह जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. असे असताना भाजी घ्यायला चाललो, नातेवाइकांना डबा घेऊन चाललो आहे, मेडिकलमध्ये गोळ्या घ्यायला चाललो आहे, अशी कारणे सांगून अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत होते. त्यामुळे सर्व बंद असूनही गर्दी कशी ही गर्दी सर्वांच्या चिंतेचा विषय बनली होती. यावर रसत्यावर दिसेल त्याची चाचणी करण्याची मोहीम पोलीस व आरोग्य विभागाकडून हाती घेतली गेली. या चाचणीमध्ये अनेकजण पॉझिटिव्ह निघाले. विनाकारण फिरणाऱ्यांची यामुळे चांगलीच धावपळ उडाली. काहींना तर थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले गेले. चाचणीच्या भीतीने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होऊन गर्दी ओसरली. कोरोनाची भीती त्यात विनाकारण चाचणी, यामुळे दुकानांतही फारशी गर्दी होताना दिसत नाही. थेट जागेवरच चाचणी केल्याचा परिणामी आता दिसू लागला आहे. सकाळी व संध्याकाळी, अशा दोनवेळेत ही चाचणी केली जात आहे. ज्या भागात जास्त गर्दी होते, अशा भागांचा शोध घेऊन तिथे चाचणी करण्यास सुरुवात केल्याने भाजीसाठी होणारी गर्दीही कमी हाेऊ लागली आहे.
......
हातात पिशवी घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढली
कठोर निर्बंध लागू असल्याने विनाकारण फिरणारे पोलिसांनी विचारल्यास हातातील पिशवी दाखवितात. त्यांच्याकडे कारण ही तयार असते. भाजीपाला आणायला चाललो आहे, तर कोणी नातेवाइकाचा डबा घेऊन चाललो, असल्याचे कारण देत आहेत. मेडिकल जवळ असल्यास मेडिकलमध्ये चाललो, तर काही जण किराणा आणायला चालले असल्याचे कारण देऊन पळ काढतात.
....
विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी
एकूण चाचणी
७ हजार ८५५
...
पॉझिटिव्ह
२३२
...
शहरात १२ ठिकाणी चाचणी
शहर व परिसरात पोलीस व महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज १० ते १२ ठिकाणी चाचणी केली जाते. दररोज एकाच ठिकाणी न बसतात, दररोज वेगवेळ्या ठिकाणी अँटिजेन चाचणी होते. जिथे गर्दी होते, अशा ठिकाणी चाचणी केली जाते. त्यामुळे गर्दी नियंत्रणात आली आहे.
...