नेवासा : कत्तल करण्यासाठी चालवलेल्या सहा गायांसह पीकअप गाडी नेवासा पोलिसांनी सापळा लावून पकडली. पोलीसांनी तीन लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस कॉन्स्टेबल भरत शेषराव घुगे यांनी फिर्याद दिली असून याबाबत सविस्तर हकीगत अशी आहे की, सोमवारी रात्री श्रीरामपूरकडून खडकाफाटा मार्गे औरंगाबादकडे काही इसम कत्तलीच्या इराद्याने पिकअप (क्रमांक एम. एच. २० , इ.जी.०१९५) यातून जनावरांची वाहतूक करणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारकडून सहायक पोलिस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांना मिळाली. हे वाहन पकडण्यासाठी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर औरंगाबाद मार्गावर सापळा लावण्यात आला. रात्री नऊच्या सुमारास औरंगाबादच्या दिशेने येणारी पिकअप येताना दिसली. पोलिसांनी सदरची जीप अडवून गाडी बाजूला घ्यायला सांगितले.या गाडीमध्ये चालकसह एक इसम होता. त्यांना पिकअपमध्ये काय आहे विचारले असता त्याने जनावरे आहे असे सांगितले. त्यानंतर पिकअपची पाहणी केली असता त्याला ताडपत्रीने मागील भाग बंद केला होता. सदरची ताडपत्री वरून पहिले असता आतमध्ये सहा गाया दाटीवाटीने भरून वाहतूक चालू होती. पोलीसांनी सहा गायांसह एक पिकअप गाडी असा ३ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून अमजद सुभानखान कुरेशी(वय २५ रा.नारेगाव जि. औरंगाबाद) व सय्यद नजीर सय्यद उस्मान(वय ४१ रा.संजयनगर जि. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार भैलूमे हे करीत आहेत.