अहमदनगर: हेल्मेट न वापरणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारत ११८ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे़ मंगळवारी सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात वाहतूक शाखेच्या अधिका-यांनी हेल्मेटसह, सिटबेल्ट व विनापरवाना वाहन चालविणा-यांवर कारवाई केली.पोलीस प्रशासनाने १ डिसेंबर पासून २०१८ पासून नगर शहरात हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती केली आहे़ हेल्मेट सक्तीचे मात्र पोलीसांकडूनच उल्लंघन होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वाहतूक शाखेला अधीक्षक कार्यालयात तपासणी मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते़ सोमवारी सकाळी ९ वाजेपासून वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील तिनही प्रवेदशद्वाराजवळ ठाण मांडून बसले होते़ हेल्मेट घालून न येणा-या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला़ सीटबेल्ट न वापरणा-या अधिका-यांच्या वाहनांवरील चालकांनांनाही दंड करण्यात आला़ वाहनांचा इन्शुरन्स व परवाना नसणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ कारवाई झालेल्यांमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, इतर विभागातील कर्मचारी व काही वकिलांचाही समावेश आहे़