"अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 10:50 PM2024-01-04T22:50:28+5:302024-01-04T22:56:31+5:30

अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून अन्याय झाल्याचे म्हटले.

"People are not satisfied with Ajit Dada's betrayal, people will take account at the right time", Anil Deshmukh | "अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील"

"अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील"

शिर्डी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे "ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची" अंतर्गत पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शरद पवारांसह पक्षातील सर्वच प्रमुख नेत्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र, या शिबिरातील पहिला दिवस गाजला तो राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने. आव्हाड यांनी राम हा मांसाहारी होती, तो बहुजनांचा होता, असे विधान केल होते. मात्र, हे आव्हाड यांचे व्यक्तिगत मत असून पक्षाचे विधान नसल्याचे स्पष्टीकरण माजी मंत्री व आमदारअनिल देशमुख यांनी दिले. त्यानंतर, येथील मेळाव्यात बोलताना देशमुख यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.

अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून अन्याय झाल्याचे म्हटले. तसेच, खोट्या प्रकरणातून मला १४ महिने तुरुंगात डांबले. अखेर कुठलाही पुरावा न सापडल्याने जामीनावर माझी सुटका झाल्याचं त्यांनी सांगितलं. तर, राष्ट्रवादीतील फुटीवर भाष्य करताना मोदींसह अजित पवारांनाही लक्ष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक स्टेटमेंट दिलं की, शरद पवार सहाब ने क्या किया? पण पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एका मुलाखतीत साहेबांच्या कामांचे कौतुक केले होते व त्यांना शेतकऱ्यांच्या मसीहा असे म्हटले होते, असे म्हणत मोदींनी केलेल्या आरोपावरुन अनिल देशमुख यांनी भूमिका मांडली. त्यानंतर, अजित पवारांच्या बंडावरही त्यांनी भाष्य केलं. 

अजित दादांनी केलेली गद्दारी ही लोकांना पटलेली नाही, लोक त्याचा योग्य वेळी हिशोब घेतील. पुढील काळामध्ये आपल्याला सत्ताधाऱ्यांचे खोटी आश्वासने लोकांपुढे आणणे गरजेचे आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही, व त्यासाठी आपल्याला एकत्रित मिळून काम करणे अत्यंत गरजेचे आहे, असे म्हणत त्यांनी एक शायरीतील शेअरही म्हटलं. कुछ ही देर की खामोशी है, फिर शोर आयेगा; अरे आपका तो वक्त है, हमारा दौर आयेगा..!, असे अनिल देशमुख यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयारी नाही

गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे राजकारण चालू आहे व ते महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शेतकरी अडचणीत असताना सुद्धा हे सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक, कांदा उत्पादक, संत्रा उत्पादक शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे पण या झोपलेल्या सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. विजेचा, पिक विम्याचा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही, असेही देशमुख यांनी म्हटले. 
 

Web Title: "People are not satisfied with Ajit Dada's betrayal, people will take account at the right time", Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.