अहमदनगर : भाजपाने शिवसेनेसोबत राहून गद्दारी केली. या गद्दारांना गाडण्यासाठी आता सर्वसामान्य जनताच निवडणुकांची वाट पाहत आहे. हे सरकार मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करत नाही. कारण त्यांना पराभवाची भीती आहे. अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी राज्य सरकारवर केली. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवारी (28) नगर शहरात आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्याला महापौर रोहिणी शेंडगे, माजी आमदार विजय औटी, शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम, उल्हास पाटील, शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, सहसंपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. वानखेडे म्हणाले केंद्र सरकार देशातील कंपन्या विकत असून सध्या देशात अंदाधुंद कारभार सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही. शेतीमालाला भाव नाही. म्हणून राज्यात घटनाबाह्यरित्या स्थापन झालेल्या सरकारला जनता वैतागली आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. यावेळी उपनेते विजय कदम, विनोद घोसाळकर, उल्हास पाटील, साईनाथ दुर्गे यांनीही राज्य सरकारवर टीका केली.या मेळाव्याला नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर व राहुरी तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान सभागृहात झालेल्या या मेळाव्याला अपेक्षित उपस्थिती नसल्याने उपनेते विजय कदम यांनी पदाधिकाऱ्यांवर चांगलेच नाराजी व्यक्त केली.