नेवासा : तालुक्यातील गोणेगाव येथील अविनाश शेटे या तरुणाने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. खोटा गुन्हा नोंदवल्याबाबत ठाणे अंमलदारावर त्वरित कारवाई व्हावी, या मागणीसाठी अविनाश शेटे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते.
अविनाश यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्या पोलिसांची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यासाठी वेळोवेळी उपोषण केल्यानंतर ही मागणी पूर्ण होत नसल्याने 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानुसार तो व त्याचे वडील विठ्ठल शेटे हे दोघे मोटरसायकलवर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आले. त्याने मोटरसायकलवरुनच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्यास सुरुवात केली. दरम्यान नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर देवकाते, अंबादास गीते, गुंजाळ यांच्यासह बंदोबस्त कामी असलेल्या पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.