किरण जगताप, कुळधरण शासनाच्या विविध निकषांची कागदोपत्री पूर्तता करुन कर्जत तालुक्यात सुरु असलेल्या अनेक पेट्रोलपंपावरुन हवा, पाणी, शौचालय या सुविधा गायब झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होते. कर्जत तालुक्यात पेट्रोल पंपांची संख्या वीसच्या आसपास आहे. ठराविक पेट्रोल पंपावरच सुविधा व गुणवत्तेचे निकष पाळले जातात. बहुतांशी पेट्रोल पंपावर सुविधा पुरविण्यात ऐशीतैशी परिस्थिती आहे. पंपावर येणार्या ग्राहकांसाठी पंप चालकाने मोफत सुविधा पुरविण्याची तरतूद असताना नियमांची पायमल्ली होतांना दिसते. निकष झुगारले ! पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनामध्ये हवा भरण्याची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. इंधनाची शुध्दता तसेच गुणवत्ता यांचे निकष करणे हे पेट्रोल पंप चालकांसाठी आवश्यक केले आहे. इंधनाचे प्रत्येक दिवसाचे दर, एकूण साठा, इंधनाची शुध्दता दर्शविणारे पत्रक आदी माहितीच्या अद्यावत नोंदी पंपाच्या दर्शनी भागावर लावणे नियमाने बंधनकारक आहे. एवढे नियम व निकष झुगारुन तालुक्यातील काही पेट्रोल पंप चालकांनी मनमानी सुरु आहे. व्यवस्था नावापुरती तालुक्यातील अनेक पंपांवर ग्राहकांसाठी पिण्याचे पाणी, हवा भरण्याची व्यवस्था, शौचालय आदी सुविधा नाहीत. तर काही पंपांवर ही व्यवस्था फक्त नावापुरती उरली आहे. शासनाने घालून दिलेल्या निकषांची पूर्तता करण्यामध्येही पंपचालक उदासीन दिसतात. रखडलेली शौचालयांची कामे, तुटलेले पाण्याचे नळ, गळून पडलेले मशिनचे काटे, हवेचे पाईप या समस्यांनी पंपावरील सुविधांचे तीन तेरा वाजले आहेत. ग्राहकांमध्ये जागृतीचा अभाव पंपावर येणार्या ग्राहकांमध्ये जागृतीचा अभाव दिसतो. त्यामुळे हवा भरण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, इंधनाची शुध्दता आदी बाबतची विचारणा पंप व्यवस्थापकाकडे होत नाही. त्याचा परिणाम म्हणून पंपचालक ग्राहकांना सुविधा पुरविण्याबाबत उदासीन असल्याचे दिसतात.नियम व निकषांचे उल्लंघन करणार्या संबंधित पंप चालकांवर त्वरित कारवाई करण्यात येईल. तसेच ग्राहकांना सुविधांपासून वंचित ठेवणार्या कर्जत तालुक्यातील पंपांची माहिती संकलीत करुन लवकरच जिल्हाधिकार्यांना पाठविण्यात येईल. - जयसिंग भैसडे, तहसीलदार कर्जत
पेट्रोल पंप चालकांकडून नियमांची ‘ऐशीतैशी’
By admin | Published: May 30, 2014 11:25 PM