अहमदनगर : येथील भा. पा. हिवाळे शिक्षण संस्थेचे माजी सचिव फिलीप बार्नबस (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (दि. ९) निधन झाले. आय. एम. एस. येथील प्राध्यापक डॉ. विक्रम बार्नबस व महिंद्रा लॉजिस्टिक्स कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी विशाल बार्नबस यांचे ते वडील होत तर अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांचे ते काका होते. अहमदनगर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत टी. बार्नबस व जे. बार्नबस यांचे ते धाकटे बंधू होते.
फिलीप बार्नबस यांनी समाजकार्यासाठी आपले आयुष्य वाहून घेतले होते. टाटा इन्स्टिट्यूट, मुंबई येथून समाजकार्य अभ्यासक्रमात त्यांनी विशेष प्राविण्यासह पदव्युत्तर पदवी मिळवली. अमेरिकेत जाऊन शिकागो विद्यापीठात समाजकार्य विषयातील उच्च शिक्षणही त्यांनी घेतले. सोलापूर येथील मराठी मिशनच्या ख्रिस्त सेवा समाजकल्याण या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. या संस्थेवर जवळपास चाळीस वर्षे ते संचालक म्हणून कार्यरत होते. मराठी मिशनच्या नागपाडा नेबरहुड हाऊस, मुंबई व पुणे येथील सोसायटी ऑफ सेंट मेरी ह्या संस्थेतही त्यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले. २००५-०६मध्ये नगर येथील भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेचे काम पाहण्यास सुरुवात केली. हिवाळे शिक्षण संस्थेमध्ये अध्यक्ष व सचिव अशा महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या.
--
फोटो-१० फिलिप बार्नबस