शेवगाव तालुक्यातील दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी तोबा गर्दी होत होती. यामुळे लसीकरणातील पारदर्शक पद्धतीला छेद दिल्याचा आरोप जनतेतून झाला. अशातच ग्रामस्तरावर लसीकरण करण्याचा निर्णय झाला आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, पुन्हा लसीकरणासाठी रांगा, गर्दी होऊ नये यासाठी दुसरा डोस असलेल्या नागरिकांची पहिला डोस घेतलेल्या तारखेच्या प्राधान्य क्रमानुसार निवड करण्यात आली. जेवढे डोस उपलब्ध आहेत तेवढ्या नागरिकांना फोन करून लसीकरणासाठी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात येते. त्यानंतर नागरिक येतात. सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जोशी व ग्रामपंचायतीचे संचालक मंडळ, ग्रामदक्षता समितीच्या सदस्यांनी केलेला हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग आहे.
.............
लसीकरण सुरू झाल्यापासून लसीकरणासाठी अपुऱ्या लसी मिळत आहेत. याउलट लस घेणाऱ्यांची संख्या भरमसाठ असल्याने अनेक नागरिकांचा हिरमोड होत आहे. तरीही जनतेने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.
- डॉ. कैलास कानडे, वैद्यकीय अधिकारी, दहीगावने.