अहमदनगर : मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात जाऊन तेथील दूरध्वनीवरुन तहसीलदारांना वाळूची वाहने सोडण्याचा आदेश देण्यापर्यंत वाळूतस्करांनी मजल गाठली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसमोर हा प्रकार घडल्याने त्यांनी तत्काळ मंत्र्यांकडे तक्रार दिल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मंत्र्यांनी दिला आहे.शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मंत्री पाटील हे त्यांच्या दालनामधील अॅण्टी चेंबरमध्ये एका बैठकीत व्यस्त होते. त्यावेळी त्यांच्या दालनात एक जण आला. मंत्र्यांच्या टेबलवर असणाऱ्या दूरध्वनीवरुन त्याने नगर जिल्'ातील कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांना दूरध्वनी केला. ‘मी महसूलमंत्र्यांच्या दालनातून बोलत आहे. जी वाळूची वाहने पकडली आहेत ती सोडून द्या. मंत्रिमहोदयांनी तसे सांगितले आहे,’ असा आदेशच त्याने तहसीलदारांना दिला. संभाजी ब्रिगेडचे नगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्यासह ब्रिगेडचे कार्यकर्ते व इतर काही अभ्यागत यावेळी दालनात बसले होते. त्यांच्यासमोर हा प्रकार झाला.याबाबत टिळक भोस यांनी मंत्रालयातील अधिकाºयांकडे तक्रार करत ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासायला लावले. त्यानंतर मंत्री पाटील यांनी तातडीने आपल्या कार्यालयातील दूरध्वनीचे आऊटगोर्इंग बंद करण्याचा आदेशही दिल्याचे भोस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मंत्र्यांकडून कारवाईचा आदेशसंभाजी ब्रिगेडने तक्रार करताच तुम्हाला आलेला दूरध्वनी बनावट असल्याचे कोपरगावच्या तहसीलदारांना कळविण्यात आले आहे. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचा आदेशही दिल्याचे महसूलमंत्री पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नगर जिल्हयात वाळूतस्करांनी हैदोस घातला आहे. याबाबतची तक्रार करण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो. तर तेथे हा आणखीच गंभीर प्रकार दिसला. वाळू तस्करांनी सरकारच ताब्यात घेतले आहे की काय? असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे. हा कार्यकर्ता नेहमी या दालनातून असे दूरध्वनी करत असण्याची शक्यता आहे. कारण तो अत्यंत सराईतपणे फोन करताना दिसला, असे टिळक भोस यांनी सांगितले.