अहमदनगर : मुसळधार पावसानंतर नगरमधील रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. हे खड्डे नगरकरांसाठी डोकुदुखी ठरत आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविताना होणारे अपघात, वाहतूक कोंडी, अशा समस्यांना नगरकरांना तोंड द्यावे लागत आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने खड्डेमय रस्त्यांशिवाय नगरकरांना दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे मणक्याचे आजार उद्भवत आहेत.
ण्सळधार पावसात नगरमधील रस्त्यांची दुर्दशा होते. शहरातील आयुर्वेद कॉलेज चौक, टिळक रोड रस्ता, वाडियापार्क समोरील रस्ता, जुनी महानगरपालिका, बेग पटांगण समोरील रस्ता, शनी चौक रस्ता, नालेगाव पटवर्धन चौक रस्ता, गुलमोहर रोड, कल्याण रोड, लालटाकी, नालेगाव, चितळे रोड, माणिक चौक, कापडबाजार, नवीपेठ, अमरधाम या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत जोड रस्ते, गल्ल्या, प्रभागातील छोटे मोठे रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. पेव्हर ब्लॉकचे रस्तेही ठिकठिकाणी खचल्याचे आढळून आले आहेत. खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात होऊ लागले आहेत. दुचाकीस्वरांना अक्षरश: जीव मुठीत धरून वाहने चालवावे लागत आहेत. विशेष म्हणजे भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांवरून वाहने घसरून अनेक अपघात झाले. जे रस्ते पाईप टाकण्यासाठी खोदले होते, ते पावसाळ्यापूर्वी म्हणजे मे महिन्यापर्यंत दुरुस्त झाले असते तर आज ही वेळ नगरकरांवर आली नसती. मात्र, त्यावेळी पदाधिकारी व प्रशासनही हातावर हात धरून बसले. लॉकडाऊन संपला. पण, रस्त्यावर टोपलीभर मुरूमही पालिकेकडून टाकला गेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत असून, याकडे सत्ताधाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.
...
पावसाळ्यापूर्वी महापालिका झोपली होती का ?
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन हा स्वतंत्र विभाग महापालिकेत कार्यरत आहेत. पावसाळा सुरू होण्याआधीच नालेसफाई, रस्त्यांची डागडुजी, गटारींची साफसफाई यासारखी कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे. परंतु, या काळात काहीच काम झाले नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर पॅचिंगसाठी निविदा काढली गेली. पाऊस थांबल्यानंतर लगेच काम सुरू होईल, या महापालिकेच्या म्हणण्यावर उन्हाळ्यात झोपले होते का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
....
सत्ताधारी दालने अन् पदग्रहण सोहळ्यात व्यस्त
शहरातील रस्त्यांची दुर्दैशा झाली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता संपुष्टात येऊन महाविकास आघाडी सत्तेवर आली. भाजपाच्या काळात खड्डे बुजविण्याचे नियोजन झाले नाही. हे जरी खरे असले तरी महाविकास आघाडीने सत्तेच्या चाव्या हाती आल्यानंतर खड्डेमुक्त नगरसाठी काय प्रयत्न केले का, हा प्रश्नच आहे. सत्ता स्थापनेनंतर महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, याची दालने चकाचक झाली खरी; पण कारभाराला वेग मिळाला नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे.
..
पाऊस संपला की खड्डे बुजवू
सध्या अधूनमधून पाऊस सुरू असतो. पावसात रस्त्यांची डागडुजी करणे शक्य नाही. सध्या हवामान खातेही वारंवार पावसाचे अंदाज देत असते. त्यामुळे सध्या डागड़ुजी करणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते संजय शेंडगे, संभाजी कदम, सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. पाऊस थांबेपर्यंत लोकांनी खड्ड्यांत पडायचे का? असे पत्रकारांच्या प्रश्नावर या नेत्यांनी मात्र मौन बाळगले, तर शेंडगे यांनी एक कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली.
---------
सूचना फोटो: साजिद