श्रीगोंदा : प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या शानदार सोहळ्यात यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथावर येथील संत शेख महंमद महाराज यांना स्थान मिळाले आहे. या चित्ररथावर महाराष्ट्रातील १४ संतांच्या प्रतिकृती बरोबरच महंमद महाराज यांची प्रतिमा झळकणार आहे.
महाराष्ट्रातील संत परंपरा ही या चित्ररथाची थीम आहे. यावर सुरूवातीला संत ज्ञानेश्वर माउली असतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सुवर्णक्षण फिरत्या देखाव्यावर असेल. त्यापाठोपाठ या रथाच्या चोहोबाजूने राज्यातील चौदा संतांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये संत नामदेव महाराज, संत सेना महाराज, संत जनाबाई, संत शेख महंमद महाराज, संत निळोबा महाराज, संत गोरोबा आदींचा समावेश आहे. या चित्ररथावर या संतांच्या अभंगवाणी ही साकारण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या व मराठी भाषेत विपुल लेखन व ग्रंथ संपदा असणाऱ्या येथील संत शेख महंमद महाराज यांची महती दिल्लीच्या राजपथावर झळकणार असल्याने श्रीगोंदेकरांनी आनंद व्यक्त केला.