अहमदनगर : हवामान विभागाने यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे पाऊस वेळेवर येण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाही कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी पावणेसात लाख हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वाधिक दीड लाख हेक्टरवर बाजरीचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीही पर्जन्यमान चांगले होते. जवळपास जिल्ह्यात सरासरीच्या १४८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामाची उच्चांकी पेरणी झाली होती. गेल्या वर्षीसारखाच यंदाही हवामान विभागाने वेळेवर व पुरेसा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरीप हंगामागाचे ६ लाख ७४ हजार हेक्टवर पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात पेरणीची सरासरी ४ लाख ४८ हजार हेक्टर असते. मात्र गेल्या दोन वर्षात पेरणी क्षेत्र वाढत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८२ हजार ८८६ हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीन, बाजरी, कांदा बियाणांच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी हाेत्या. त्या चुका टाळण्यासाठी कृषी विभागाने यंदा विशेष नियोजन केले आहे. शेती मशागत, पेरणीबाबत शेतकऱ्यांना गाव, तालुकास्तरावरून कृषी सहायक, कृषी विस्तार अधिकारी, कृषी मंडलाधिकारी यांच्यामार्फत प्रबोधन केले जात आहे. गाव पातळीवर विविध व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नियोजन केले जात आहे.
---
पीकनिहाय पेरणी क्षेत्र असे
पीक क्षेत्र (हेक्टर)
बाजरी १,५५,०००
कापूस १,३५,०००
सोयाबीन ९५,०००
मका ७०,०००
तूर ६५,०००
मूग ५४,०००
उदीद ५२,०००
भात १९,०००
भुईमूग ९,६०८
----
खते, बियाणांचे नियोजन असे..
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने २ लाख ५५ हजार मेट्रिक टन वेगवेगळ्या खतांची मागणी केली आहे. त्यातील २ लाख ११ हजार मेट्रिक टन खत मिळाले असून १ लाख टन खते शिल्लक आहेत. या हंगामासाठी कृषी विभागाकडून ६० हजार ३९२ क्विंटलची मागणी करण्यात आली आहे.