अहमदनगर : विविध क्रीडा स्पर्धांतील सहभागाबद्दल दहावी-बारावी परीक्षेत खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या ग्रेस गुण सवलतीपासून खेळाडू वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे प्रस्ताव सादर करण्यास कमी कालावधी राहिला असून यंदा कोरोनाची स्थिती असल्याने किमान सहभागाची अट शिथिल करण्याची मागणी क्रीडा संघटनांनी शासनाकडे केली आहे.
शासन निर्णयानुसार सहावी ते बारावीपर्यंत केव्हाही जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असल्यास सवलतीचे गुण देण्यात येतात. २५ जानेवारी २०१९ च्या शुद्धी पत्रकानुसार जिल्हास्तर प्राविण्य ५ गुण, विभागस्तर सहभाग ५, तर प्राविण्य १० गुण, राज्यस्तर सहभाग १०, तर प्राविण्य १५ गुण, राष्ट्रीयस्तर सहभाग १५ तर प्राविण्य २० गुण, आंतरराष्ट्रीय सहभाग २०, तर प्राविण्य २५ गुण दिले जातात. परंतु दहावी व बारावीत असताना किमान सहभागाची अट घालण्यात आली आहे. कोविडमुळे या वर्षी क्रीडा स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने दहावी व बारावीत असताना स्पर्धेत किमान सहभागाची अट शिथिल करून विनाअट या वर्षी खेळाडूंना ग्रेसगुण देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ नगर, शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीचे वतीने क्रीडा आयुक्त, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, क्रीडा मंत्री सुनील केदार, शिक्षक आमदार कपिल पाटील, डॉ. सुधीर तांबे आदींकडे केली आहे. मात्र मागील दोन महिन्यात यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे शासनाने विना अट ग्रेस गुण द्यावेत, अशी मागणी महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, अमरावती महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे, समन्वय समितीचे सचिव ज्ञानेश काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आनंद पवार, बालभारती अभ्यास गटाचे राजेंद्र पवार, ॲथलेटिक्स असोसिएशनचे राजेश जाधव, क्रीडा भारतीचे संजय पाटील, महाराष्ट्र छात्र सेनेचे प्रीतम टेकाडे, मुख्याध्यापक महासंघाचे कैलास माने, राज्य सचिव राजेंद्र कदम आदींनी केली आहे.