अकोले : अगस्ती साखर कारखाना संशयाच्या भोवऱ्यात अडकवून बंद पाडायचा आणि तो खासगी तत्त्वावर चालविण्यासाठी घ्यायचा, असा तथाकथित शेतकरी नेत्यांचा डाव असून, अकोलेकर जनता हे कदापि खपवून घेणार नाही. अगस्तीची बदनामी करून पत कमी करण्यापेक्षा हिम्मत असेल तर कारखाना ताब्यात घेऊन चालवून दाखवा, असा इशारा संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री मधुकर पिचड यांनी दिला.
अगस्ती कारखान्याच्या संचालकांवर गेल्या काही दिवसांपासून सतत वेगवेगळे आरोप हाेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिचड यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संचालक मंडळ कारखान्यावरील कर्ज फेडून कारखाना सक्षमपणे चालविण्यास समर्थ आहे. काही लाेकांनी कारखान्याची बदनामी सुरू केली आहे. अशी बदनाम करू नका? चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाल्यावर कारवाई होईलच. कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज उभारणी सुरू केली जाते; पण काही सभासद त्यात अडथळा आणून संस्थेबद्दल गैरसमज पसरवीत आहेत. त्यामुळे तालुक्याची कामधेनू बंद पडण्याची शक्यता आहे. तेव्हा तालुक्यातील सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवणाऱ्यांनी कारखान्याचा अपप्रचार करू नये. विद्यमान संचालक मंडळ गावोगावी जाऊन कारखान्याची परिस्थिती सभासदांसमोर मांडणार आहे. अगस्तीची बदनामी करणाऱ्यांचे कारखाना उभारणीत योगदान काय, असा सवाल पिचड यांनी उपस्थित केला.
दहा वर्षांपूर्वी इथेनॉल प्रकल्पास त्या शेतकरी नेत्याने विरोध केला नसता तर आज कारखाना कर्जबाजारी नसता. तुमच्या दुराग्रही भूमिकेमुळे एकदा कारखाना बंद पडला होता. पुन्हा कारखाना बंद पडू नये, ही सर्व पक्षीय संचालक मंडळाची भूमिका आहे. कारखान्यावर ३६५ कोटी कर्ज असले तरी १९३ कोटींची साखर कारखान्याकडे आहे. साडेचार लाख मेट्रिक टन ऊस कार्यक्षेत्रात गाळपासाठी उभा आहे. दोन, तीन वर्षांत कारखाना कर्जमुक्त होईल, असा विश्वास अध्यक्ष पिचड यांनी व्यक्त केला.
अगस्तीच्या आर्थिक परिस्थितीची माहिती उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी देत निवडणूक लागणार आहे, तेव्हा जशास तसेच उत्तर देऊ. अगस्तीत पक्षीय राजकारण केले जात नाही. त्या शेतकरी नेत्यांच्या मागणीवरूनच एफआरपीपेक्षा अधिक पैसे ऊस उत्पादकांना दिल्याने कारखान्यावर कर्जाचा बोजा चढला. प्रतिकूल परिस्थितीत आम्ही कारखाना चालविला. आता ऊस वाढला. कारखान्यास चांगले दिवस येतील, हे लक्षात घेऊन कारखान्याची बदनामी करून कारखाना ताब्यात घेण्याची दिवा स्वप्ने तथाकथित शेतकरी नेत्यांना पडू लागली आहेत, असे सीताराम गायकर यांनी स्पष्ट केले.
..............
संचालकांचे राजीनामे
संचालक मिनानाथ पांडे, महेश नवले, अशोक देशमुख यांनी संचालक मंडळाची बाजू मांडत कारखान्याच्या अध्यक्षांकडे राजीनामे दिले असल्याचे सांगितले. यावेळी माजी चेअरमन तथा संचालक प्रकाश मालुंजकर, गुलाब शेवाळे, रामनाथ वाकचौरे, कचरू शेटे, सुनील दातीर, मनीषा येवले, वैभव पिचड, राजेंद्र डावरे, अशोक आरोटे, बाळासाहेब देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, भीमसेन ताजणे, सुधाकर देशमुख, प्रभारी कार्यकारी संचालक एकनाथ शेळके, आदी उपस्थित होते.