बाळासाहेब काकडेश्रीगोंदा फॅक्टरीवर स्वत:चे वनराईयुक्त घर बांधण्यासाठी घेतलेल्या १० गुंठे जागेला साधे कंपाऊंड केले. या जागेत प्रा.शिवप्रसाद चंद्रकांत घालमे यांनी सुधारित पध्दतीने काकडी लागवड केली. त्यातून अवघ्या तीन महिन्यात तीन मेट्रीक टन काकडीचे उत्पन्न घेतले. यामधून दीड लाखांची कमाई झाली.दहा वर्षापूर्वी वडिलांच्या निधनानंतर शिवप्रसाद व वैभव यांनी खडतर परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. वैभव यूपीएससी परीक्षा पास झाला तर शिवप्रसाद नेट परीक्षा उत्तीर्ण झाला. शिवप्रसादने प्राध्यापक म्हणून घारगाव येथील बीएड कॉलेजवर नोकरी स्वीकारली.वनराईयुक्त घर बांधण्यासाठी घोड कालव्यालगत दहा गुंठे जागा दोन वर्षांपूर्वी खरेदी केली. यामध्ये काँग्रेसचे तण आले. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादूर्भाव वाढला. त्यावर शिवप्रसाद घालमे यांनी कृषिमित्र मधुकर काळाणे, प्रवीण दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिंबक मल्चिंग पेपरचा वापर करून दहा गुंठे जागेत काकडी लागवड केली.कॉलेजला जाण्यापूर्वी दररोज दोन तास काकडीच्या छोटेखानी शेतात काम करून काकडी फुलविली. तीन टनाचे विक्रमी उत्पादन मिळाले. मिळालेल्या बाजारभावानुसार दीड लाखांचे उत्पादन निघाले. त्यासाठी शिवप्रसादची आई व पत्नीने मदत केली. त्यांनाही काकडीच्या मळ्यात काम करण्याचे समाधान लाभले.दहा गुंठ्याचा प्लॉट मोकळा पडला होता. शेतीत काम करण्याची आवड असल्याने कमी जागेत काकडीचे पिक घेण्याचा निर्णय घेतला. मधुकर काळाणे, प्रवीण दवणे यांनी सहकार्य केले. चांगले पीक आहे. सकाळी दोन तास काकडीच्या छोटेखानी शेतात काम केल्याने ताजेतवाने वाटू लागले. अंगातील आळस दूर झाला. दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली. घरासाठी घेतलेल्या प्लॉटमध्ये काकडीचे पिक तरारले याचे खूप आत्मिक समाधान लाभले, असे प्रा. शिवप्रसाद घालमे यांनी सांगितले.
घरासाठी घेतलेल्या प्लॉटमध्येच फुलविला काकडीचा मळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:59 PM