अहमदनगरः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहा यांचं नातं किती खास आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. चहा आणि चहावाला यांच्याबद्दल त्यांच्या मनातील विशेष प्रेम अनेकदा पाहायला मिळालंय. तसाच काहीसा अनुभव आज साईबाबांच्या शिर्डीतही आला. नंदुरबारमधील काही ग्रामस्थांशी ई-संवाद साधताना त्यांना नंदुरबारमधील चौधरी चहावाल्याची प्रकर्षानं आठवण झाली.
साई समाधीचं दर्शन आणि पूजनानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या दहा लाभार्थ्यांना घराची चावी देण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद झाला, ई-गृहप्रवेश केला. त्यात नंदुरबारच्या लाभार्थ्यांशी ते बराच वेळ मराठीत बोलले.
घर कसं आहे?, ते मिळवताना त्रास झाला नाही ना?, मुलं काय करतात?, मुली शाळेत जातात का?, अशी चौकशी मोदींनी केली. घर मिळाल्यावर मिठाई वगैरे केली की नाही?, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर सर्व आप्तांना मिठाई वाटल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. तेव्हा, तुम्ही मला मिठाई पाठवली नाही, अशी तक्रार मोदींनी गमतीत केली. त्यावर, मिठाईसाठी नंदुरबारला येण्याचं आमंत्रण लाभार्थ्यांनी त्यांना दिलं आणि मोदी मनाने नंदुरबारला पोहोचले.
'मी सुरुवातीच्या काळात नंदुरबारला खूप वेळा यायचो. तिथल्या चौधरी चहावाल्याचा चहा आजही आठवतो. ट्रेनने प्रवास करताना हा चहा मी आवर्जून प्यायचो, अशी आठवण त्यांनी सांगितली. त्यातून चहा आणि चहावाल्याबद्दल मोदींच्या मनातील आत्मियता पुन्हा जाणवली.